धाराशिव | प्रतिनिधी
आदर्श आश्रम शाळा, शिंगोली येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती फुलसुंदर मॅडम होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती सविता रासने (महिला हेड कॉन्स्टेबल, आनंदनगर, धाराशिव) उपस्थित होत्या.
प्रमुख अतिथी श्रीमती सविता रासने यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन हार अर्पण करून व श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला.
स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी अंगावर चिखल, शेण, दगड-गोटे झेलत समाजातील अन्यायकारक रूढींविरुद्ध लढा दिला. त्या काळात स्त्रियांसाठी चूल आणि मूल एवढेच कार्य मानले जात असताना, स्त्रियांनी शिक्षण घेणे गुन्हा समजले जात होते. अशा परिस्थितीतही सावित्रीबाई फुले यांनी आपल्या ध्येयापासून कधीही माघार घेतली नाही, असे त्यांनी नमूद केले.
दीन, दलित, अनाथ व विधवा महिलांसाठी शिक्षणाचे व ज्ञानाचे दरवाजे उघडणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी दुष्काळ व प्लेगसारख्या साथीच्या आजारांमध्येही प्राणाची पर्वा न करता लोकांची व विद्यार्थ्यांची सेवा केली.
“विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले — इतके अनर्थ एका अविद्येने केले” हा त्यांचा मूलमंत्र आजही समाजासाठी मार्गदर्शक आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी श्रीमती सविता रासने यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा विषयक महत्त्वपूर्ण माहिती दिली. या कायद्यांतर्गत गुन्हेगाराला अत्यंत कडक शिक्षा असून जामीन मिळत नसल्याचे स्पष्ट केले. पोलीस यंत्रणा सदैव जनतेच्या संरक्षणासाठी सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास विद्यानिकेतन माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री अण्णासाहेब चव्हाण, पर्यवेक्षक रत्नाकर पाटील, चंद्रकांत जाधव, खंडू पडवळ, दीपक खबोले, प्रशांत राठोड, सुधीर कांबळे, इरफान शेख, कैलास शानिमे, संजीवकुमार मस्के, विशाल राठोड, मल्लिनाथ कोणदे, शेषेराव राठोड, आदर्श आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सतीश कुंभार, वसतिगृह अधिक्षिका वैशाली शितोळे, सुरेखा कांबळे, ज्योती राठोड, बालिका बोयणे, ज्योती साने मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी गोविंद बनसोडे, सागर सूर्यवंशी, अमोल जगताप, सचिन अनंतकळवास, रेवा चव्हाण, लिंगा आडे यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


