तेरणाची 1 एप्रिल पुर्वी निविदा न काढल्यास लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन - Terna Sugar Factory

0
तेरणाची 1 एप्रिल पुर्वी निविदा न काढल्यास लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन - Terna Sugar Factory

उस्मानाबाद/प्रतिनिधी
तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी 1 एप्रिल पूर्वी निविदा न काढल्यास जिल्हा बँक व लोकप्रतिनिधींच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा एक मुखी निर्णय तेरणा बचाव संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्याबाबत या भागातील शेतकऱ्यांनी एकत्रीत येऊन तेरणा बचाव संघर्ष समिती गठीत केली असून या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात तेरणा कारखान्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर खासदार, आमदार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालका बरोबर बैठक घेण्यात आली. लोकप्रतिनिधींनी तेरणा कारखाना सुरू करण्यासाठी सकारात्मक आश्वासन दिले असून हा कारखाना लवकर सुरू करण्यासाठी पावले उचलावीत यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि.2 मार्च रोजी ढोकी येथे तेरणा बचाव संघर्ष समितीच्यावतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत दि.1 एप्रिल पूर्वी कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया काढावी अन्यथा दि.1 एप्रिल रोजी पत्रकार परिषद तर दि. 5 ते 8 एप्रिल या दरम्यान खासदार व आमदार यांच्या घरासमोर तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय संघर्ष समितीच्यावतीने घेण्यात आला आहे. याबाबत  दि.3 मार्च रोजी संबंधितांना निवेदन देऊन याची पूर्वसूचना देण्यात येणार आहे. त्यामुळे तेरणा कारखाना सुरू करणे किती गरजेचे व आवश्यक बनले आहे ? याची दाहकता व‌ प्रचिती शेतकऱ्यांच्या कृतीवरून दिसून येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top