महाविकास आघाडीच्या जल्लोष ! , जिल्हाध्यक्ष जल्लोषापासून कोसो दूर ! , जिल्हाध्यक्ष नामधारी असल्यामुळे शहराध्यक्षांवर जबाबदारी !

0

महाविकास आघाडीच्या जल्लोष ! , जिल्हाध्यक्ष जल्लोषापासून कोसो दूर ! , जिल्हाध्यक्ष नामधारी असल्यामुळे शहराध्यक्षांवर जबाबदारी !


उस्मानाबाद दि.३ (प्रतिनिधी) - औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाचे आ. विक्रम काळे हे सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नावाखाली जल्लोष साजरा करण्यात आला. या जल्लोषामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उस्मानाबाद शहराध्यक्षाची गडबड पुन्हा समोर आली आहे. त्यामुळे अनेक घटक पक्षातील पदाधिकारी या जल्लोषामध्ये सहभागी होण्यासाठी वाटेवर असतानाच जल्लोषाचा कार्यक्रम संपल्याच्या मार्गावर होता. महाविकास आघाडीतील मित्रपक्षातील कार्यकर्त्यांना हा आनंदच एक प्रकारे हिरावून घेण्याचे काम झाले आहे. त्यामुळे त्या पदाधिकाऱ्या विरोधात घटक पक्षातील नेत्यांनी उघड व जाहीर नाराजी दि.३ फेब्रुवारी रोजी कार्यक्रम स्थळीच प्रगट केली.

उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आ. विक्रम काळे यांच्या विजयाच्या जल्लोष करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबाद शहराध्यक्ष यांच्यावर सोपविण्यात आली होती.
आलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी ताबडतोब जल्लोष साजरा केला. मात्र महाविकास आघाडीतील पक्षांना हा जल्लोष साजरा करण्यापूर्वी केवळ १० मिनिट अगोदर निरोप त्रयस्थामार्फत निरोप पाठवून औपचारिकता पूर्ण केली. त्यामुळे जल्लोष साजरा करण्यासाठी आपल्या जवळच्या मंडळींना सोबत घेतले. तर काहीजण जवळच असल्यामुळे जल्लोष सुरू असताना त्यामध्ये नाममात्र सहभाग नोंदविला. आ. काळे यांना मतदान करावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) काँग्रेस, रिपाइं आदींसह इतर घटक पक्षातील जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी एकत्र प्रचार केला. त्यामुळे मतदारांनी देखील भरभरून मतदान केले. 


जिल्हाध्यक्ष नामधारी असल्यामुळे शहराध्यक्षांवर जबाबदारी !

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार हे पदभार स्वीकारल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमास सतत दांडी मारतात. मात्र प्रदेश स्तरावरील नेते आल्यानंतर वेळ मारून नेण्यासाठी धावपळ करून मी किती कार्यरत आहे ? हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. जिल्ह्याचे मुख्यालय व जिल्हाध्यक्षांचे निवासस्थान यामध्ये जवळपास शंभर किलोमीटरचे अंतर असल्यामुळे ते पक्षाच्या कामांसाठी वेळच देऊ शकत नाहीत हे वास्तव आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पक्षाच्या कामाचे नियोजन व जबाबदारी हे एक प्रकारे शहराध्यक्ष चालवीत असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. 


बनवेगिरी आली समोर !

जल्लोषाला अनेक नेत्यांना निरोप वेळेवर न मिळाल्यामुळे अनेकजण कार्यक्रम संपल्यानंतर आले. मात्र त्यांना जल्लोष साजरा करता न आल्यामुळे त्यांनी पुन्हा विजयी जल्लोषाच्या व महाविकास आघाडीच्या घोषणा देत आपल्या मनाचे समाधान करून घेतले. तसेच माध्यम प्रतिनिधींना बातमी संकलनासाठी फक्त पाच मिनिटे अगोदर माहिती देण्यात आली त्यामुळे त्यांची बनवेगिरी समोर आल्याचे स्पष्ट झाले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top