शांताबाई काकडे यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार

0



शांताबाई काकडे यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार

- पौर्णिमा खरमाटे यांना क्रीडाभूषण, तर हॅलो मेडिकल फौंडेशनला समाजभूषण

- मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीची घोषणा


 उस्मानाबाद, दि. 10 - मागील 15 वर्षांपासून सुरू असलेल्या महत्वपूर्ण अशा मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या यंदाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सौभाग्यवती शांताबाई लिंबराज काकडे यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार, कर्मवीर मामासाहेब जगदाळे शिक्षकरत्न पुरस्कार समाधान शिकेतोड, कुस्तीपटू पौर्णिमा खरमाटे हिला क्रीडाभूषण तर छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार अणदूर येथील हॅलो मेडिकल फौंडेशनला जाहीर करण्यात आला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्यावतीने समाजातील विविध घटकांत अतुलनीय कार्य करणार्‍या मान्यवरांना पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार आहे. जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्ष डॉ. वसुधा दिग्गज दापके-देशमुख, कार्याध्यक्ष सौरभ देशमुख, सचिव महेश उंबरे यांच्या उपस्थितीत समिती पदाधिकारी व सदस्यांची बैठक पार पडली. यावेळी समितीच्यावतीने देण्यात येणार्‍या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. नवी मुंबई येथील पोलीस उपायुक्त तिरूपती काकडे यांच्या मातोश्रींना राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तर कुस्तीमध्ये मोठ्या संघर्षाने स्वतःचा नावलौकिक सिध्द करणार्‍या पौर्णिमा खरमाटे हिचाही सन्मान केला जाणार आहे. विविध शैक्षणिक प्रयोगातून विद्यार्थ्यांची सर्वांगीण गुणवत्ता वाढविण्यासाठी कार्यरत असलेले समाधान शिकेतोड यांना कर्मवीर मामासाहेब जगदाळे शिक्षकरत्न तर मागील तीन दशकांपासून आरोग्य, शिक्षण, लिंग समभाव, अशा विविध क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या अणदूर येथील हॅलो मेडिकल फौंडेशनला छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्काराने गुरूवार, 12 जानेवारी रोजी जिजाऊ जयंतीदिनी गौरविण्यात येणार आहे.

वाबळे महाराजांचे समाजप्रबोधनपर किर्तन
दरवर्षीप्रमाणे प्रतिमापूजन व जिजाऊ वंदना झाल्यानंतर भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिजाऊंच्या जयंतीदिनी जन्मलेल्या नवजात मुलींच्या मातांचा सन्मानही जिजाऊ जन्मोत्सव समितीच्यावतीने केला जाणार आहे. सायंकाळी उस्मानाबाद शहरातील राजमाता जिजाऊ चौक येथे पुरस्कार वितरण सोहळा आणि संत गाडगेबाबा यांचा कृतीशील वारसा पुढे घेवून जाणारे ज्ञानेश्वर माऊली महाराज वाबळे यांचे समाजप्रबोधनपर किर्तन आयोजित करण्यात आले आहे. शहर व परिसरातील शिवभक्त तसेच रसिकश्रोत्यांनी या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top