तुळजापूर तालुक्यातील सावरगाव परिसरात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकतेच खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला. कोणताही शेतकरी पंचनामे पासून वंचित राहणार नाही याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
पाहणीदरम्यान राजेनिंबाळकर म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या मेहनतीचे पीक प्रतिकूल हवामानामुळे पूर्णपणे हानीग्रस्त झालेले पाहून मन खिन्न झाले. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून द्यावी. शासनानेही या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन त्वरित दिलासा द्यावा.”
तसेच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत शेतकऱ्यांना मदत कार्यात विलंब होऊ नये यावर भर दिला.
“पावसामुळे झालेले नुकसान भरून निघणार नाही, मात्र शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या सोबत उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. शासनाने तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, हीच अपेक्षा आहे,” असेही राजेनिंबाळकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, तालुक्यातील इतर काही गावांमध्येही सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र समोर येत असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाकडून पंचनामे सुरू होऊन शेतकऱ्यांना मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.