कुळ कायद्याने मिळालेल्या जमीनीच्या सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी उपोषण
उस्मानाबाद दि.२० (प्रतिनिधी) - कुळ कायद्याने मिळालेल्या जमिनीच्या सातबार्यावर मालकी रखान्यात नोंद घेण्याच्या एकमेव मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.२० ऑगस्टपासून उपोषण सुरु करण्यात आले आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा येथील राम येदा इंगळे यांना कुळ कायद्याने १९७५ साली करजखेडा येथील यशवंत हरिबा चव्हाण यांच्याकडून सर्वे नंबर ५३ मधील गट नंबर ७७ मधील १२ एकर ३१ गुंटे जमीन मिळालेली आहे. जमीन मिळाल्यापासून इंगळे वहिवाटीत आहेत. त्यामुळे या मिळालेल्या जमिनीच्या ७/१२ वर मालकी रखान्यात मालक म्हणून नोंद घेण्याच्या मागणीसाठी वारंवार निवेदनाद्वारे मागणी केली. परंतू अद्यापपर्यंत नोंद घेण्यात आलेली नाही. दि. ४ जानेवारी २०१८ रोजी राम येदा इंगळे हे मयत झाले असून त्यांचे व्यंकट राम इंगळे, महादेव राम इंगळे, बारकुलबाई किसन गायकवाड व पार्वती केशव ढेंग हे कायदेशीर वारस आहेत. वारसाचा फेर होण्यासाठी व कुळ कायद्याने जमिनीच्या सातबार्यावर आमच्या नावांची नोंद घेण्यासाठी तहसिलदार, उस्मानाबाद, तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांना वारंवार अर्ज देऊन पाठपुरावा देखील केला. मात्र आमच्या अर्जाचा कसल्याही प्रकारे विचार केला नाही. विशेष म्हणजे औरंगाबाद येथील भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक यांनी या अपिलांमध्ये दि.१६ जून २०१९ रोजी आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे. त्यामुळे ७/१२ उताऱ्यावर नोंद लावण्यात यावी या एकमेव मागणीसाठी व्यंकट इंगळे व महादेव इंगळे या दोघांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.