आगामी रब्बी हंगामात पिकांसाठी तेरणा कालव्यातून पाण्याची आवर्तने मिळणार – आ. राणाजगजितसिंह पाटील
उस्मानाबाद : तेरणा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालवा दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून लवकरच काम पूर्ण करून आगामी रब्बी हंगामात पिकांसाठी कालव्याद्वारे पाण्याचे आवर्तने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे सरकारच्या काळात अनेकदा मागणी करूनही या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर यासाठी रु. ३.४१ कोटी निधी मंजूर करून घेण्यात आला होता, आज या कामाच्या निविदा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
तेरणा मध्यम प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठी उपलब्ध असतानाही देखभाल दुरुस्ती न झाल्याने कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडता येत नव्हते. जून महिन्यात उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेवून संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून प्रत्यक्ष नस्ती वर स्वाक्षरी घेतली होती व तद्नंतर आठवडाभरातच याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला होता.
तेरणा प्रकल्पावरील डाव्या व उजव्या कालव्याची एकूण लांबी ३२ कि.मी. असून याद्वारे तेर, रामवाडी, डकवाडी, इर्ला, दाऊतपूर, कोळेवाडी व भंडारवाडी या गावांतील १६५२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. या भागातील शेतकऱ्यांसाठी कालव्याची दुरुस्ती करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे होते, या अनुषंगाने सतत पाठपुरावा सुरु असून वेळेत व चांगली कामे करून घेण्याच्या सूचना संबंधित कार्यकारी अभियंता यांना करण्यात आल्या आहेत.
तसेच बंद पाईपलाईन द्वारे थेट शेतात पाणीपुरवठा करण्याच्या पथदर्शी प्रकल्पातील तांत्रिक दोष दूर करून योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत.