google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 आदर्श व्यक्तिमत्त्व असलेले पिताजी - किशनराव यल्लावाड , विशेष लेख

आदर्श व्यक्तिमत्त्व असलेले पिताजी - किशनराव यल्लावाड , विशेष लेख

0
आदर्श व्यक्तिमत्त्व असलेले पिताजी - किशनराव यल्लावाड , विशेष लेख

जीवन जगत असताना आयुष्यात अनेक चढउतार येतात.
हरलो की तिथंच प्रवास संपवणारी अनेक माणसं अवतीभवती दिसून येतात.परंतु  आपलं जीवन इतरांच्या सेवेसाठी समर्पित करणारी आणि "मानव सेवा हीच ईश्वर सेवा"समजून अखंड आयुष्य समाज सेवेसाठी वेचणाऱ्या थोडक्याच विभूती समाजामध्ये आपल्याला दिसून येतात.   मानव जन्म एकदाच भेटणार आहे, त्याचं आपण सोनं केलं पाहिजे .आपलं जीवन इतरांच्या कल्याणासाठी समर्पित करणाऱ्या व्यक्ती उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेऊन  त्या वाटेवरून चालताना दिसून येतात.मानवी जीवन सुख आणि दुःखाने भरलेले आहे.मानवाने जन्माला आल्यानंतर आपलं जीवन समाजोपयोगी कार्यासाठी समर्पित करणं आणि पाठीमागे सद्गुणाचा ठेवा ठेऊन इहलोकी निघून जाणं , एवढंच त्याच्या हातात असतं. अवतीभवती पाहत असताना आपल्या लक्षात येते की समाजात अनेक विभूती आपलं उभं आयुष्य समाजसेवेसाठी वेचताना दिसून येतात.गावपातळीवर गोरगरिबांना मदत करणाऱ्या,अडचणीच्या काळात संकटात धावून जाणाऱ्या व्यक्ती पहायला मिळतात.त्यामुळे संपूर्ण गावच त्या व्यक्तीचं गुणगान गात असतो . गावात मान आणि सन्मान असतो.कदाचित त्या व्यक्ती प्रसिद्धी पासून खूप दूर असतात.त्यांना प्रसिद्धी आवडत नाही . हाती घेतलेले  काम निष्ठेने पार पाडणे हा त्यांच्या मनाचा स्थायीभाव असतो.त्यांचा अनेकांना आधार  वाटत असतो."जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे" या उक्तीप्रमाणे अशा व्यक्ती जीवन जगत असतात.त्यातूनच सदृढ ,निकोप ,मूल्यवर्धित समाजनिर्मिती होत असते.सामाजिक प्रगतीसाठी ,निकोप समाज निर्मितीसाठी,सामाजिक पुनर्भरणासाठी समाजात अशा व्यक्तींची अत्यंत गरज असते.


      दहा वर्षांपूर्वीची गोष्ट .मी ज्यांच्या सहवासात आलो,  ते म्हणजे परळी येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असणारे प्रा.डॉ.राजकुमार किशनराव यल्लावाड सर हे होत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत मराठी विषयात पीएच्.डी.चे मार्गदर्शक म्हणून डॉ.राजकुमार यल्लावाड सरांकडे मी संशोधक विद्यार्थी म्हणून काम करू लागलो. संशोधन कामासाठी मी परळीला सरांकडे महिन्या दोन महिन्याला जात असे. परळीत गेल्यानंतर सर घरी आदराने बोलवायचे .चहा ,नाश्ता विचारायचे. मितभाषी असणारे सर स्वभावाने छानच.मी सामान्य कुटुंबातील आहे की सधन?माझी जात कोणती ? माझी कौटुंबिक परिस्थिती काय ? माझी शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे? यापूर्वी ना माझी सरांची कधी भेट ना गाठ. तरीही कोणतीही विचारपूस सरांनी केली नाही. मानवतेचं नातं जपणारे सर मी अनुभवत होतो.माणसातील माणुसकी शोधणारे,मावतेचा स्वीकार करणारे ,मानवी मूल्यांवर निष्ठा असणारे.जातीधर्माच्या भिंती तोडून माणुसकीचा धर्म जपणारे सर . मुळातच हे संस्कार आले कोठून?तर त्याचाही शोध घ्यावा लागेल.मी ज्यावेळी सरांकडे जायचो ,त्यावेळी सरांचे वडील घरात त्यांच्याकडे दिसायचे.त्यांनी वयाची जवळपास सत्तरी ओलांडलेली असावी .स्वभाव मितभाषी ,कोणाशी जास्त बोलायचे नाहीत.माझी सहजपणे विचारपूस करायचे. कोठून आलात? सरांकडे काम आहे का? मीही थोडंच बोलायचो सर घरी आहेत म्हणून सांगायचे.सर वडीलांना पिताजी म्हणत.त्यावेळी त्यांच्या मधील पुत्र प्रेमाचं नातं मला अधिक घट्ट वाटायचं.लहानपणापासून वडिलांनी मुलांवर केलेले सुयोग्य संस्कार ... त्याची फलश्रुती म्हणजे वडिलांच्या सुयोग्य विचाराखाली झालेली सरांच्या परीवाराची निकोप वाढ.आज अवतीभवती पाहत असताना वडिलधाऱ्यांचे हाल पाहिले की मन उद्विग्न होतं आणि मग आठवायला लागते सरांच्या घरी वडिलधाऱ्यांना दिली जाणारी मान सन्मानाची वागणूक.खरंच प्रत्येक घरी असं वातावरण निर्माण झालं तर? वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमांची निर्मितीच होणार नाही. 



       प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड सरांचं उदगीर पासून 14 किलोमीटर अंतरावर छोटंसं कासराळ हे गाव.चारी बाजूला डोंगराळ भाग, निसर्गरम्य प्रदेश आणि बरड जमीन दिसून येते . पिताजींना शेती अल्पच.त्यामुळे शेतीत उत्पन्नही थोडेसे मिळत असे .पिताजींना  तीन मुले असा वेलीवर संसार फुललेला.तत्कालीन परिस्थितीत गावात शिक्षणाच्या सुविधा मोठ्या प्रमाणात पोहचल्या नव्हत्या.अक्षर ओळख नसणाऱ्या पिताजींना शिक्षणाविषयी विलक्षण आवड . मुलांनी शिक्षण घ्यावं ,मोठं व्हावं,नाव कमवावं असं पिताजींना  नेहमी वाटायचं.त्यांनी शिक्षणाची आस मनी बाळगलेली. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी कधी तडजोड केली नाही की परिस्थितीचा बाऊ केला नाही .सर्व मुलांना उच्च शिक्षण दिले.सगळी मुलेही कर्तृत्ववान निघाली. गावच्या राजकारणातही यल्लावाड कुटुंब अग्रेसर. पिताजींचा एक मुलगा कासराळ गावचा सरपंच झाला.आज पिताजींची सूनबाई कासराळ गावामध्ये विद्यमान सरपंच आहेत.त्यांनी मुलगा सून असा भेद कधी केला नाही.  शिक्षण ,राजकारण,समाजकारण ,उद्योग या क्षेत्रात यल्लावाड कुटुंब यशस्वी ठरले. या पाठीमागे पिताजींची दूरदृष्टी दिसून येते.मानवी जीवनात अनेक सुख दुःखाचे प्रसंग समोर येतात.परंतु पिताजी कधी हरले नाहीत.
 ज्या मातीत खेळलो,बागडलो , लहानाचा मोठा झालो , आपणही त्या मातीचे  देणे लागतो , हा उदात्त दृष्टिकोन पिताजींनी समोर ठेवला . त्यांनी गावातील व गावपरिसरातील  कष्टकरी, मजूर, शेतकरी यांना माफक दरात आयुर्वेदिक सुविधा पुरवून  त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला .निसर्गातील झाडपाल्यापासून विविध रोगांवर ते औषधे बनवत. त्यामध्ये  विंचू , साप चावला ,कावीळ ,नागयेडा झाला असेल तर यावर आयुर्वेदिक पध्दतीने उपचार करत.त्याचा खात्रीपूर्वक ईलाजही होत असे.


अवतीभवतीचं समाज वास्तव बारकाईने न्याहाळत जीवन जगत.  संत महात्म्य,समाजसुधारक,महापुरुषांच्या विचाराचा जागर केला पाहिजे. महापुरुषांचे विचार तळागाळातील समाज मनापर्यंत पोहचविले पाहिजेत,तरच मरगळलेल्या अवस्थेत असणारा समाज जागा होणार आहे .सामाजिक प्रगती होणार आहे .याची सरांच्या वडिलांना जाण आहे.मानवी मूल्यांवर पिताजींची अढळ निष्ठा होती. आज जात ,धर्म, पंथ या गोष्टीमध्ये माणूस गुरफटत चालला आहे . पिताजींनी या गोष्टींना जीवनामध्ये स्थान दिले नाही. त्यांचं निसर्ग आणि मानवतेवर विलक्षण प्रेम होते . विनयता , कठोर परिश्रम आणि साधेपणासाठी आयुष्यभर ओळखले जाणारे पिताजी  पैसा अथवा वंशाने नव्हे तर आपला प्रेमळ स्वभाव आणि आदर्श वागणुकीमुळे गावात, गावपरिसरात आदर्श व्यक्तींच्या पंक्तीत विराजमान झाले .त्यांनी आयुर्वेदिक झाडपाल्याच्या  माध्यमातून अनेक रोगी माफक दरात बरे केले. गावपरिसरातील अनेक आजारी व्यक्ती कायमस्वरूपी त्यांच्याकडे येत असत.मोफत औषधोपचार करून घेत असत.पिताजींनी मानवी मनाची नाळ अतिशय चपखलपणे विणली , मानवतेचा वसा नेहमीसाठी त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग ठरला . आपल्या अंतर्मनाशी प्रामाणिक राहत ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण करणं तर जणू त्याच्या स्वभावातच भिनलं होतं . सतत असलेला नावीन्याचा ध्यासच त्याचं वेगळेपण सिद्ध करत असे . स्वत : कडे उपलब्ध असलेल्या वेळेतील क्षणाक्षणाचा सदुपयोग करत .पिताजी मनाने खूप संवेदशील वागत . ते सोज्वळ व साधे होते .समाजमनाशी असलेली अतुट नाळ ही अगदी त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत जोडलेली .ना मोठी पदव्यांची सामग्री सोबत ना आर्थिक सुबत्ता.माणसाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी  मानवसेवेचा  मार्ग अंगीकारला आणि त्याच सत्याच्या वाटेने ,निष्ठेने अखंड चालत राहिले .
     गावपातळीवर जातीयता टोकाची अशाही स्थितीत  जातिभेदाच्या भिंती तोडून माणुसकीचा रथ ओढणारे पिताजी .सर्वांशी आपुलकीने ,प्रेमाने वागणारे .माणसाने जातीपातीचे गीत गाऊ नये. मानवाच्या उत्थानाचे गीत गावे असे आपण म्हणतो याची साक्ष त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून पदोपदी जाणवत गेली.पिताजींनी शिक्षण महत्त्वाचे मानले.मुलांना उच्चशिक्षित बनवले. पिताजींना विद्यासागर किशनराव यल्लावाड,दयासागर किशनराव यल्लावाड, प्रा.डॉ.राजकुमार किशनराव यल्लावाड अशी मुले आहेत.डॉ.राजकुमार  यल्लावाड हे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ,औरंगाबाद विद्यापीठात अभ्यास मंडळावर कार्यरत आहेत.


 सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रात सर अग्रेसर आहेत.साहित्यिक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेला आहेच.कविता ,गझल ,समीक्षात्मक लेख,वर्तमानपत्रात  सातत्यपूर्ण विविध विषयांवर येणारे अभ्यासपूर्ण व चिंतनात्मक लेख, समाजप्रबोधनपर व्याख्यान याही गोष्टीमध्ये सर सातत्याने कार्यरत असतात.पिताजींना 
 सौ.अनुराधा विद्यासागर  यल्लावाड,
 सौ.वनिता दयासागर यल्लावाड,सौ.अंजली राजकुमार यल्लावाड या तीन उच्चशिक्षित सूना आहेत.त्यातील एक  विद्यमान कासराळ गावच्या सरपंच आहेत.
 पिताजींना सहा नातू आहेत.आज त्यांचे नातू  वेगवेगळ्या क्षेत्रात उच्चशिक्षण घेत आहेत.त्यामध्ये महेश दयासागर यल्लावाड (अभियांत्रिकी ),पूजा विद्यासागर यल्लावाड (एम. कॉम .),मनीष दयासागर यल्लावाड (अभियांत्रिकी - पदविका ),प्रसाद विद्यासागर यल्लावाड (अभियांत्रिकी ),अभिनव राजकुमार यल्लावाड ( १ २ वी - Sci ),समीक्षा राजकुमार यल्लावाड ( शालेय शिक्षण चालू ) असा हा शिक्षणवेडा यल्लावाड परीवार ... हा उच्चशिक्षित परिवार पिताजींचा समाजसेवेचा वारसा यापुढेही चालू ठेवतील यात शंका नाही.असे समाजमनाचं नातं जपणारे व्यक्तिमत्त्व 19 सप्टेंबर 2022 रोजी उपचारादरम्यान उदगीर येथे अनंतात विलीन झाले.'मरावे परी कीर्तीरुपी उरावे" असे म्हटले जाते.आज पिताजी भलेही आपल्यात नसले त्यांचे कार्य ,त्यांचे संस्कार,त्यांच्या आठवणी कायम  हृदयात राहतील. त्या आम्हाला प्रेरणा देतील. त्यांच्या कार्यास व त्यांच्या विनम्र पावन स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो.

-
*प्रा.डॉ.तुळशीराम उकिरडे*
सहाय्यक प्राध्यापक,
मराठी विभाग,
तेरणा महाविद्यालय,उस्मानाबाद
मो.क्र.9881103941

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top