राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी १०० ट्रूनॅट मशिनचे लोकार्पण
मुख्यमंत्री ( Eknath Shinde ) - एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री ( Devendra Fadnavis ) देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी १०० ट्रूनॅट मशिनचे लोकार्पण करण्यात आले.
राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, नागपूर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, पालघर, अमरावती, गोंदिया, यवतमाळ, रायगड, पुणे, अहमदनगर, नांदेड या जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात या मशिनच्या माध्यमातून क्षयरोग निदानासाठी वापर करण्यात येणार आहे. यावेळी सचिव नविन सोना, आयुक्त धीरज कुमार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
इंडियन ऑईलच्या माध्यमातून सीएसआर निधीतून हे १०० ट्रूनॅट मशिन आरोग्य विभागाला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याद्वारे क्षयरोग निदान लवकरात लवकर करण्यासाठी या मशिनचा उपयोग होतो. राज्याला क्षयरोगमुक्त करण्याच्या मोहिमेसाठी या मशिनमुळे मोठे बळ मिळाल्याचे सांगत राज्याला क्षयरोगमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.
यावेळी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक अर्निबन घोष, महाव्यवस्थापक गौतम दत्ता आदी अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.