पिस्तुल कानशिलावर लावून मारहाण, जातीवाचक शिवीगाळ! , तुळजापुरात पुन्हा गुंडगिरी; सहा जणांविरूध्द गुन्हा नोंद
तुळजापूर, दि. 21 -
‘तू आमच्यासमोर पांढरे कपडे घालून फिरतो का?, असे म्हणून दलीत समाजातील रिपाइंच्या (आठवले गट) कार्यकर्त्याच्या कानशिलावर पिस्तूल लावून जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि तोंडावर लघुशंका आणि सुपारी खावून थुंकणे व त्यानंतर ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तुळजापुरातील सहा जणांविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी व विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापूर शहरातील शुक्रवार पेठ येथील गोरख भागवत पारधे यांचा तुळजापुरात नारळ विक्रीचा व्यवसाय आहे. ते रिपाइं (आठवले गट)चे कार्यकर्ते आहेत. शहरातील गुंड प्रवृत्तीचा गणेश रोचकरी व त्याचे मित्र हातात हत्त्यार घेवून दारू पिवून सातत्याने तुळजाभवानी मंदिराजवळ येवून गोरख पारधे याच्या छोट्या दुकानाजवळ येवून जबरदस्तीने दुकान काढायला लावतात. 16 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता पारधे हे घाटशीळ पार्किंगमध्ये असताना, पारधे यांना दुसर्याच्या फोनवर संपर्क करून, माणूस पाठवून पारधे यांना हडको येथील हंगरगेकर शाळेच्या शेजारील मैदानात बोलावले. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास, तिथे गणेश रोचकरी व इतर लोक दारू पित बसले होते. यातील गणेश रोचकरी याने पारधे यांना, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत रॉडने मारण्यास सुरूवात केली, त्याचे सोबती असलेले विश्वजीत अमृतराव, सुशांत सपाटे, लखन भोसले व इतर दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी व बिअरच्या बाटल्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर गणेश याने, पारधे यांच्या कानशिलावर पिस्तूल लावून, मांगट्या तू आमच्यासमोर पांढरे कपडे घालून फिरतोस काय, असे म्हणत पारधे यांच्या तोंडावर लघुशंका केली व तोंडात चघळलेल्या सुपारी पारधे यांच्या तोंडावर थुंकली. कसे बसे आपले प्राण वाचवून पारधे यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना तुळजापूर येथे प्राथमिक उपचार केले. व तेथून धाराशिव येथे पुढील उपचारासाठी पाठवले. उपचार घेत असताना पारधे यांनी दिलेल्या माहितीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात गणेश रोचकरी, लखन भोसले, विश्वजित अमृतराव, सुशांत सपाटे व इतर दोन अज्ञातांविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी व अॅट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान तुळजापूर शहरातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा गुंडांवर कायमस्वरूपी हद्दपारीची कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांतून व्यक्त होत आहे.