google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 अ‍ॅट्रॉसिटी अर्थसाह्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ५ हजारांची लाच मागणी ; समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक ताब्यात

अ‍ॅट्रॉसिटी अर्थसाह्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ५ हजारांची लाच मागणी ; समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक ताब्यात

0
धाराशिव | 31 डिसेंबर 2025
धाराशिव येथील समाजकल्याण कार्यालयात अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यातील अर्थसाह्याचा दुसरा हप्ता बँक खात्यात जमा करून देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक रमेश मालू वाघमारे (वय 37) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणातील तक्रारदार (पुरुष, वय 47) यांनी 4 डिसेंबर 2025 रोजी धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, समाजकल्याण निरीक्षक कपिल थोरात यांनी 20 हजार रुपये, तर कनिष्ठ लिपिक रमेश वाघमारे यांनी 5 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता.

पडताळणीत लाच मागणी स्पष्ट
तक्रारीच्या अनुषंगाने 4, 7 आणि 11 डिसेंबर 2025 रोजी पडताळणी करण्यात आली. या दरम्यान समाजकल्याण निरीक्षक कपिल थोरात यांनी पंचांसमक्ष लाच मागितल्याचे निष्पन्न झाले नसले, तरी कनिष्ठ लिपिक रमेश वाघमारे यांनी अ‍ॅट्रॉसिटी अर्थसाह्याचा दुसरा हप्ता मंजूर करण्यासाठी पंचांसमक्ष 5 हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
सापळा कारवाई, संशयामुळे पैसे स्वीकारले नाहीत
पडताळणीत तक्रारीस दुजोरा मिळाल्यानंतर 11 व 12 डिसेंबर 2025 रोजी सापळा कारवाई राबविण्यात आली. मात्र, आरोपीस संशय आल्याने त्याने तक्रारदाराकडून पैसे स्वीकारण्यास नकार दिला व भेट घेणे टाळले. अखेर आज आरोपी रमेश वाघमारे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अंगझडती व पुढील तपास
आरोपीच्या अंगझडतीत अंदाजे 40 हजार रुपये किंमतीची होंडा अ‍ॅक्टिवा स्कूटर, वनप्लस कंपनीचा मोबाईल फोन (किंमत अंदाजे 10 हजार रुपये) व दोन पेन मिळून आले आहेत. मोबाईलची तपासणी सुरू असून आवश्यकतेनुसार जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. आरोपीची घरझडती प्रक्रिया सुरू आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी
ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब मनोहर नरवटे (ला.प्र.वि. धाराशिव) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांनी केले. मार्गदर्शन पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व अपर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांनी केले.

नागरिकांना आवाहन
जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून कायदेशीर फी व्यतिरिक्त लाच मागितली जात असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भ्रष्टाचार तक्रार संपर्क :
📞 टोल फ्री क्रमांक : 1064
📞 पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर : 9011092777
📞 पो. उपअधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव : 9270231064 / 9049519833

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top