धाराशिव विमानतळ आता केवळ फ्लाइंग ट्रेनिंगपुरते मर्यादित न राहता मेंटेनन्स-रिपेअर-ओव्हरहॉल (MRO) प्रकल्प ,पार्किंग सुविधा व प्रवासी सेवे बरोबर कृषी निर्यात कार्गो टर्मिनलसह बहुउद्देशीय विमानतळ म्हणून विकसित होणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे मोठी औद्योगिक गुंतवणूक, कृषी मालाची थेट हवाई निर्यात, मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती आणि पर्यटन विकासाला भरीव चालना मिळणार आहे. भविष्यात धाराशिव विमानतळ प्रादेशिक हवाई वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र (Regional Hub) म्हणून उभे राहील, असा ठाम विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव विमानतळावर आले असता, त्यांच्याकडे विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराची अत्यंत ठोस आणि वस्तुनिष्ठ मांडणी करण्यात आली होती. या मागणीचे महत्त्व ओळखत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणताही विलंब न करता त्याच क्षणी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (MADC) व्यवस्थापकीय संचालक (MD) श्रीमती स्वाती पांडे यांना दूरध्वनीवरून सविस्तर, तांत्रिक आणि व्यवहार्य प्रस्ताव तयार करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.त्यानंतर हिवाळी अधिवेशनात या अनुषंगाने आपण संबंधित अधिकाऱ्यांची नागपूर येथे बैठक देखील घेतली होती.मुख्यमंत्री महोदयांच्या या निर्णयक्षम आणि तत्पर नेतृत्वामुळेच आपल्या मागणीला मंजुरी मिळून प्रत्यक्ष स्वरूप प्राप्त होत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.
धाराशिव विमानतळ धावपट्टी विस्तार केल्याने १,२१८ मीटर लांबीची धावपट्टी वाढवून आता ३५०० मीटर होत आहे. त्यासाठी केलेला पाठपुरावा कामी आला आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे आपले विमानतळ हस्तांतरित करण्याचा शासन निर्णय झाला आहे. त्यामुळे भविष्यातील प्रादेशिक हवाई वाहतुकीच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून आपल्या पाठपुराव्याला यश आले असल्याची माहितीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. धाराशिव विमानतळाच्या धावपट्टीची रुंदीही ३० मीटरवरून ४५ मीटर होणार आहे. धावपट्टीची मजबुती (PCN) १० वरून ६० पर्यंत वाढवण्यात येणार आहे. यामुळे बोईंग ७३७, बोईंग ७७७, एअरबस ३२० व ३२१ सारखी मोठी व्यावसायिक विमाने धाराशिव येथे उतरण्यास सक्षम होतील. आपल्या विमानतळाचे क्षेत्रफळही आता वाढविले जाणार आहे.
धाराशिवच्या विकासाला नवे पंख
धाराशिव जिल्ह्याच्या दळणवळण, औद्योगिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने विमानतळ विस्ताराचा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे. प्रवासी विमानसेवा सुरू झाल्याने धाराशिवचा देशातील प्रमुख शहरांशी थेट संपर्क प्रस्थापित होणार असून जिल्ह्याच्या व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीला चालना मिळणार आहे.
प्रस्तावित MRO (मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल) सुविधांमुळे विमान दुरुस्ती क्षेत्रात मोठी गुंतवणूक आकर्षित होणार असून तांत्रिक व कुशल युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच कृषी निर्यात कार्गो टर्मिनल उभारल्याने शेतकऱ्यांचा शेतीमाल थेट हवाई मार्गे देश-विदेशात पोहोचेल, ज्यामुळे शेतीमालाला योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
या सर्व सुविधांचा एकत्रित परिणाम म्हणून धाराशिव विमानतळ केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाचा ‘गेमचेंजर’ ठरेल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला. हा निर्णय म्हणजे केवळ विमानतळाचा विस्तार नसून धाराशिवच्या आर्थिक, औद्योगिक आणि पर्यटन विकासाच्या दिशेने टाकलेले ठोस व दूरदृष्टीपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


