खा.बृजभूषण यांना अटक करुन जंतरमंतरवरील महिला पहिलवान आंदोलकांना न्याय द्या , जिल्हा काँग्रेसचे राष्ट्रपती मुर्मू यांना निवेदन; तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

0

खा.बृजभूषण यांना अटक करुन जंतरमंतरवरील महिला पहिलवान आंदोलकांना न्याय द्या , जिल्हा काँग्रेसचे राष्ट्रपती मुर्मू यांना निवेदन; तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

उस्मानाबाद-
महिला पहिलवानांचे लैंगिक शोषण करणार्‍या खासदार बृजभूषण यांच्यावर तातडीने कारवाई करुन अटक करुन दिल्ली येथे जंतरमंतरवर निदर्शने करणार्‍या महिला पहिवानांना न्याय द्यावा अन्यथा अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे करण्यात आली आहे. खासदारावर कारवाई न झाल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांमार्फत राष्ट्रपती मुर्मू यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले की, दिल्ली येथील जंतरमंतरवर गेल्या काही दिवसांपासून भारतीय महिला पहिलवान निदर्शने करत आहेत. भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार बृजभूषण शरणसिंग यांनी अनेकवेळा महिला पहिलवानांचे लैंगिक शोषण करुन छेडछाड केली. याबद्दल त्या जाहीरपणे दाद मागत आहेत. तब्बल एक महिन्यापूर्वी त्यांनी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी अतिशय स्पष्टपणे घटनांचे वर्णन केले आहे. दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केली. अखेर सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला.

तरीदेखील आजपर्यंत खासदार बृजभूषण शरणसिंग यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यांच्यावर लैंगिक अत्याचारासारख्या घृणास्पद कृत्याचा गंभीर आरोप असतानाही कसलीच कारवाई झालेली नाही. याबाबत सत्ताधारी भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सर्व नेते तोंडात मिठाची गुळणी धरून बसले आहेत. याच भारतीय कुस्तीगीरांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके जिंकली तेव्हा भरभरुन बोलणारे हे सगळे नेते आता गप्प का? असा सवाल निवेदनात करण्यात आला असून खासदार बृजभूषण शरणसिंग यांच्यावर ताबडतोब कारवाई करुन महिला पहिलवानांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा जिल्हा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनावर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील, जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने, वरीष्ठ उपाध्यक्ष खलील सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.स्मिता शहापूरकर, जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड.जावेद काझी, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, उमेश राजेनिंबाळकर, मुहीब अहमद आदींची स्वाक्षरी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top