गोगलगायींचे एकात्मिक आणि सामुहिक नियंत्रणाबरोबरच शेतकऱ्यांनी स्वत: तयारी करावी : जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे
उस्मानाबाद,दि.14(जिमाका):- गोगलगायींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकात्मिक आणि सामुहिक नियंत्रणाबरोबरच शेतकऱ्यांनी स्वत: जबाबदारीने तयारी करावी, असे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील शासकीय फळ रोपवाटीका पाहणीदरम्यान शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले.
यावेळी प्रियंवदा म्हद्दलकर (भा.प्र.से.), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे, तालुका कृषी अधिकारी श्री.जाधव आणि तालुक्यातील कृषी सहाय्यक आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात ढोकी, कळंब, उमरगा या भागात मागील वर्षी 157 गावात गोगलगायींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात आढळून आला होता. खरीप हंगामातील पाऊस सुरु झाल्यावर गोगलगाय आढळून आल्यास तात्काळ मोहिम राबवून सामुहिक पध्दतीने शेतातील गोगलगाय गोळा कराव्यात. वाळलेल्या गवताचे, पपईचे पाने, झेंडू, गुळाचे पाणी शिंपडलेले गवताचे ढीग, गुळाच्या पाण्यात गोणपाट ओले करुन शेतात जागोजागी ठेवल्यास त्या ठिकाणी गोगलगाय आकर्षित होतात. सूर्योदयापूर्वी तेथील गोळा झालेल्या गोगलगाय पोत्यात किंवा गोणपाटात भरुन त्यामध्ये मीठ टाकून त्या नष्ट कराव्यात व त्यांची अंडी देखील नष्ट करावीत.
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट केल्यास तसेच शेताच्या भोवती गोगलगायला प्रतिबंध करण्यासाठी चुन्याचा 10 सेमी चा पट्टा टाकावा, असेही यावेळी डॉ.ओम्बासे यांनी सांगितले.