पत्रकारांच्या सुविधांसाठी पत्रकार महामंडळ स्थापन करण्यात यावे - बोरे
Osmnabadnews : दि.२६ (प्रतिनिधी) - पत्रकारांना त्यांच्या हक्काचे घर, त्यांच्या पाल्यांना शिक्षण, पत्रकार महामंडळ, पेन्शन, संरक्षण मिळावे यासाठी व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. आजपर्यंत देखील पत्रकारांच्या अनेक संघटना होत्या. मात्र त्यामध्ये साप्ताहिक, रेडिओ, टीव्ही चॅनल्स, यूट्यूब व डिजिटल मीडिया आदी पत्रकारांना समाविष्ट करून घेतले नव्हते. मात्र या संघटनेमध्ये या सर्वांना समाविष्ट करून घेतले आहे. त्यामुळे सरकारने पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार महामंडळ स्थापन करावे असे आवाहन व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांनी दि.२५ जुलै रोजी केले.
( Osmanabad City ) उस्मानाबाद शहरातील जत्रा फंक्शन हॉलमध्ये ( Vice of Media )
वाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्यावतीने कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रात ते बोलत होते. यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, व्हॉईस ऑफ मीडिया शिक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष चेतन कात्रे, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष अमर चोंदे, प्रा. तुषार वाघमारे, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, कार्याध्यक्ष राजेश बिराजदार, सुनील देशमुख, सुभाष घोडके, गणेश शिंदे, जफर शेख, ज्योतिराम निमसे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना बोरे म्हणाले की, पत्रकार हे समाजाचे सर्व प्रश्न सातत्याने मांडून ते सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणेला भाग पाडतात. मात्र त्यांचे स्वतःचे व कुटुंबियांचे अनेक प्रश्न ते सोडवू शकलेले नाहीत. तसेच सुरुवातीच्या काळात पत्रकारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असून पत्रकारांनी प्रशासनाबरोबर व्यवस्थित समन्वय ठेवला तर त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्की मदत होईल असे त्यांनी आवर्जून नमूद केले. तर प्रिंट मीडियाचा इलेक्ट्रॉनिक मीडिया असा बदल झाला असून तो बदल पत्रकारांनी स्विकारायलाच हवा असे आवाहन त्यांनी केले. तर पत्रकार सर्व समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी सतत धडपडत असतात. त्यासाठी कुठल्याही मोबदल्याची ते अपेक्षा करीत नाहीत. मात्र इतर क्षेत्रांसारख्याच पत्रकारांच्या देखील अनेक अडचणी असून त्या समस्या सोडविण्यासाठी व्हाईस ऑफ मीडियाची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून विविध २४ विंगच्या माध्यमातून पत्रकारांना न्याय मिळवून देऊन विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच पत्रकारांना हक्काचे घर, पाल्यांना शैक्षणिक आरक्षण, पत्रकार महामंडळ यासह विविध सोयी सवलती मिळविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांनी सांगितले.
तर सुभाष घोडके म्हणाले की, पत्रकारांच्या कुटुंबीयांना एकत्र आणून त्यांचा सन्मान करण्याची संकल्पना प्रथमच या माध्यमातून झाल्याचे त्यांनी सांगितले. तर साप्ताहिक पत्रकारांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले असून अशा पद्धतीने सतत काम करीत राहिले तर पत्रकार देखील चांगल्या पद्धतीने काम करू शकतील असे त्यांनी सांगितले.
तसेच गणेश शिंदे म्हणाले की, पत्रकार सगळ्या जगाचे प्रश्न आपल्या बातमीतून मांडतात. मात्र पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही किंवा पुढे येत नाही. मात्र ( Vice of Media ) व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी अशा पद्धतीचा कार्यक्रम करण्यात येत असल्यामुळे पत्रकारांना नक्कीच न्याय मिळेल असे त्यांनी सांगितले. यावेळी सर्व उपस्थित पत्रकारांना कुटुंबियांसमवेत सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग मते यांनी तर सूत्रसंचालन शरद आडसुळ यांनी व उपस्थितांचे आभार ज्योतीराम निमसे यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील साप्ताहिकाचे संपादक, त्यांचे कुटुंबीय व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.