परांडा येथे महिला व बालकांची कायदेविषयक कार्यशाळा उत्साहात
उस्मानाबाद ,दि.28( osmanabad news ): कौटुंबिक हिंसाचारापासून महिंलाचे संरक्षण कायदा, बाल न्याय मुलांची (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015, हुंडा प्रतिबंध कायदा, बाल विवाह प्रतिबंध कायदा अशा महिला व बालकांच्या संबंधित कायद्याच्या जनजागृतीसाठी व एकात्मीक बाल संरक्षण योजनेअंतर्गत प्रत्येक गावामध्ये ग्राम बालसंरक्षण समितीची सक्षमीकरण करण्यासाठी आज 28 जुलै रोजी परांडा येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
बालकांचे हक्क अबाधित राखून त्यांच्या सर्वांगीन विकासाला चालणा देणे बालकांच्या समस्यांची सोडवणूक करणे, बालकांच्या विविध योजनांचा समन्वय साधणे, गाव पातळीवरील बालकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या हेतूने महिला व बाल विकास अधिनस्त जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने ग्राम बालसंरक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, बालक यांचा समावेश आहे. त्यांना बालकांचे हक्क, समितीचे कार्य व जबाबदाऱ्या याबाबत कार्यशाळेचे आयोजन आज 28 जुलै रोजी परांडा येथे करण्यात आले होते.
ग्राम बालसंरक्षण समितीचे प्रशिक्षण सत्राचे उद्धाटन बाल कल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रशिक्षणास प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून श्री. माने व बाल कल्याण समितीचे सदस्य दयांनद काळुंके तसेच ज्योती सपाटे हे होते. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी परिविक्षा अधिकारी व्यंकट देवकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावीक केले.
ग्राम बाल संरक्षण समितीचे सक्षमीकरण करणे व बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे मत अध्यक्ष यांनी व्यक्त केले. ग्राम बाल संरक्षण समितीची रचना, कर्तव्य व जबाबदाऱ्या याबाबत तज्ञ मार्गदर्शक यांनी मार्गदर्शन केले.
जिल्ह्यात बाल विवाहाचे प्रमाण जास्त आहे. या दृष्टीने उपाययोजना व कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे अवाहन श्री .देवकर यांनी केले. तसेच महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती सविस्तर सांगितली.
या प्रशिक्षणासाठी परांडा तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनिल अंकुश यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाल संरक्षण अधिकारी प्रज्ञा बनसोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परंड्याचे बाल संरक्षण अधिकारी बापू जबडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास हर्षवर्धन सेलमोहकर, श्री गवाड यांनी सहकार्य केले.