आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना संवेदन २०२३ कृषी किटचे वाटप
उस्मानाबाद -धाराशिव,दि.10(): 1 जानेवारी ते सप्टेंबर 2023 या कालावधीतील कर्ज, नापीकी, नैराश्य आणि अशा विविध कारणांमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना कृषी मंत्री यांच्या संकल्पनेतून तथा माणूसकीच्या भावनेतून संवेदन 2023 अंतर्गत महाराष्ट्र कृषीउद्योग विकास महामंडळ व सहयोगी संस्थामार्फत मदतीचा हात देण्यासाठी शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य व कृषी मालावर प्रक्रिया केलेली अन्न उत्पादने वाटप करण्याचे नियोजित केले आहे.
कृषी किटमध्ये निविष्ठा, खाद्यपदार्थ व रंगीत बॅग आदींचा समावेश करण्यात आला आहे. धाराशिव जिल्हयातील 8 तालुक्यांतील 76 शेतकरी कुटुंबाना (धाराशिव - 20, तुळजापुर -12, उमरगा-04, लोहारा-3, भुम-3, परंडा-8, कळंब-21 व वाशी 5 ) महाराष्ट्र कृषीउद्योग विकास महामंडळ व सहयोगी संस्था यांच्यामार्फत प्राप्त कृषी किट प्रकल्प संचालक आत्मा यंत्रणेमार्फत वाटप करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, आत्मा प्रकल्प संचालक रविंद्र माने, विभागीय व्यवस्थापक (एमएआयडीसी) एम.बी.व्हटकर, सहाय्यक व्यवस्थापक (पणन) जे.जे. ठाकुर, तालुका कृषी अधिकारी एस.पी. जाधव यांच्या उपस्थितीत धाराशिव तालुक्यातील 7 शेतकरी कुटुंबांना प्रातिनिधीक स्वरुपात संवेदन कृषी किटचे वाटप करण्यात आले. कृषी किटमध्ये परसबाग भाजीपाला बियाणे - 445 ग्रॅम, नॅनो युरीया - 500 मिली, सुक्ष्म मुलद्रव्ये ग्रेड 2 - 500 मिली, मायकोरायझा - 500 मिली, बोरॉन 20 टक्के - 500 ग्रॅम कृषी निविष्ठा तसेच नोगा हॅम्पर, कोको हाय प्रिमियम ड्रिंक्स - 250 मिली, चकली मसाला+चिवडा मसाला+शेंगदाणा चिक्की – 50 ग्रॅम+50 ग्रॅम आदी खाद्यपदार्थांचा समावेश कृषी किटमध्ये करण्यात आला आहे.