स्वस्त दरात वाळू विक्रीसाठी उपलब्धनागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करावी

0

स्वस्त दरात वाळू विक्रीसाठी उपलब्ध

नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करावी

 

धाराशिव,दि.29() जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मौजे डिकसळ व परंडा येथे नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करुन देणे तसेच अनाधिकृत उत्खननास आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू डेपोची निर्मिती करण्यात आली आहे.या वाळू डेपोमधून नागरिकांना केवळ 660 रुपये प्रतीब्रास (600 रुपये स्वामित्वधन व 60 रुपये जिल्हा खनिज प्रतिष्ठाण निधी) याप्रमाणे बांधकाम योग्य वाळू उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.सद्यस्थितीत डिकसळ येथील वाळू डेपो सुरु करण्यात आला आहे.या डेपोमध्ये मांजरा नदीपात्रातील गाळमिश्रीत वाळू ही बांधकाम योग्य करुन नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येत आहे.या डेपोतून वर्षभरात अंदाजे 39 हजार 800 ब्रास वाळू उपलब्ध होणार आहे.

                  सद्यस्थितीत नागरिकांना वाटप करण्यासाठी 300 ब्रास रेती उपलब्ध आहे.याकरिता महाखनिज प्रणाली www.mahakhanij.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावरुन नागरिकांना वाळूची नोंदणी करता येणार आहे.नागरिकांना नोंदणीनंतर प्राधान्यक्रमानुसार व त्यांच्या मागणीनुसार रेती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.यासाठी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एस.एम.एस. संदेशाद्वारे कळविण्यात येणार आहे.

                  एका कुटुंबास एका वेळी कमाल 50 मेट्रिक टन (10 ब्रास) वाळू देता येईल.त्यानंतरही वाळू पाहिजे असल्यास वाळू मिळाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यानंतर पुन्हा नोंदणी करुन वाळूची मागणी करता येईल.ग्राहकाने वाळूची मागणी नोंदविल्यानंतर 15 दिवसांत वाळू डेपोमधून वाळू घेऊन जाणे बंधनकारक असणार आहे.वाळू वाहतूक ही महाखनिज या प्रणालीवर नोंदणी केलेल्या वाहनानेच करणे बंधनकारक असणार आहे.

            ग्राहकांना वाहतूकदारांकडून अवाजवी वाहतूक भाडे आकारण्यात येवू नये म्हणून परिवहन विभागाद्वारे रेती वाहतूकीसाठी प्रती किमी दर निश्चित करुन देण्यात येणार आहे.

                तरी नागरिकांनी www.mahakhanij.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन आवश्यकतेप्रमाणे वाळू मागणीसाठी आजपासून नोंदणी करावी.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top