मिञचे उपाध्यक्ष व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
धाराशिव जिल्ह्यात ‘सॅटेलाईट स्किल सेंटर’ करण्याच्या प्रस्तावास पुणे येथील सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठाने मान्यता दिली आहे. सिम्बायोसिस विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत धाराशिव जिल्ह्यातील युवकांसाठी आधुनिक शेती व प्रक्रिया उद्योग सह उद्योगानुकूल प्रशिक्षण, जागतिक दर्जाचे कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने रोजगाराच्या संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार असल्याची माहिती ‘मिञ’चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ स्वाती मुझुमदार,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव,तहसीलदार अरविंद बोळंगे,मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्यासह
सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठाच्या विविध विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांशी व्यापक चर्चा करण्यात आली.
धाराशिव जिल्ह्यात ‘सॅटेलाईट स्किल सेंटर’ सुरू करण्याच्या प्रस्तावावर विशेष भर देण्यात आला. या उपक्रमांतर्गत उद्योग, विद्यार्थी, स्थानिक लोकसंख्या आणि विविध घटकांसाठी व्यावसायिक आणि कौशल्यात्मक प्रशिक्षण देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील युवकांना उद्योगानुकूल प्रशिक्षण, जागतिक दर्जाचं कौशल्य, शेती व प्रक्रिया उद्योग क्षेत्र तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथील सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये ही उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.
टेक्निकल टेक्सटाईल साठी सहकार्य
सिम्बायोसिसचे जगातील टेक्निकल टेक्स्टाईल क्षेत्रातील अनेक मोठ्या उद्योगां बरोबर संबंध असल्याने ते कौडगाव येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) माध्यमातून सुरू होत असलेल्या टेक्निकल टेक्सटाईल पार्क मधे गुंतवणूकदार आणण्यास देखील सहकार्य करणार असल्याचे या बैठकीत ठरले आहे.
शेतीसाठी ड्रोन आणि एआय वापराचे प्रशिक्षण
कृषी व आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या महत्वपूर्ण ज्ञानशाखाबाबतही बैठकीत निर्णय घेण्यात आला. आधुनिक शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी ड्रोनचा वापर, AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अचूक मृदा विश्लेषण,पिकांना पाणी व तणांसाठी उपाययोजना ,अन्न प्रक्रिया अशा तंत्रज्ञानांवर आधारित प्रशिक्षणही आता आपल्या जिल्ह्यातच सिंबायोसिस मार्फत दिले जाणार आहे. तरुणांना व्यावसायिक दृष्टिकोनातून ड्रोन चालवणे आणि त्याद्वारे फोटोग्राफी व विश्लेषण कार्यपद्धती शिकवण्याचा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.
सिम्बायोसिस विद्यापीठाने जर्मनी सरकारसोबत कुशल मनुष्यबळ पुरवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत असून त्याअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होतील. स्थानिक गरजा लक्षात घेता सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीच्या मार्गदर्शनाखाली सॅटेलाईट स्किल सेंटरचे स्वरूप निश्चित केले जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
यावेळी सिम्बायोसिसचे माजी विद्यार्थी आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी तुळजापूर शहराच्या पुढील ५० वर्षांसाठी 'अर्बन प्लॅनिंग' करण्याचेही आश्वासन दिले. या नियोजनात शहराच्या विस्तार, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, पर्यावरणपूरक धोरणे आणि डिजिटल शहरासाठी आवश्यक बाबींचा समावेश असेल.
युवकांसाठी नव्या युगाची सुरुवात : आमदार पाटील
धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचा कणा म्हणजे आपला युवक. सिम्बायोसिससारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेशी भागीदारी करून त्याला योग्य दिशा देण्याचा आपला प्रयत्न आहे. या माध्यमातून जिल्ह्याचा आर्थिक, सामाजिक व तांत्रिक विकास घडेल.ही बैठक एक सकारात्मक पाऊल ठरून धाराशिव जिल्ह्यातील युवकांसाठी नव्या रोजगाराची आणि सक्षम आर्थिक युगाची सुरुवात ठरेल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.