राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल राजेनिंबाळकर यांचा समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश
ऑगस्ट १६, २०२५
0
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जबर हाबाडा
जिल्हाध्यक्षांची मनमानी हेकेखोरी व महाविकास आघाडीतील स्वार्थी आमदार खासदारांच्या राजकारणामुळे पक्ष सोडला – निंबाळकर यांचा घणाघात
धाराशिव दि.१५ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल निंबाळकर यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जगता पार्टीमध्ये दि.१५ ऑगस्ट रोजी शाहीर प्रवेश केला. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांना प्रवेश देत त्यांचे स्वागत केले.
धाराशिव शहरातील प्रतिष्ठान भवन भाजप कार्यालयात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेनिंबाळकर, महिला शहराध्यक्ष कमलताई सागर चव्हाण यांच्यासह अजय पाटील, सचिन कदम, रियाज भाई शेख, सुरज पडवळ, विनोद शिरसाट, समाधान घोडके, नाना वाघमारे, गुणवंत पेठे, योगेश ननवरे, प्रतीक गायकवाड, ऋतिक देवकुळे, अमोल जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अनिल काळे, माजी नगराध्यक्ष मधुकर, तावडे, शहराध्यक्ष अमित शिंदे, ज्येष्ठ नेते सुनील काकडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, विनोद गपाट, अक्षय ढोबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यावेळी आ पाटील यांनी मी शांत स्वभावाने सर्व कामे करतो. विरोधक माझ्यावर टीका टिप्पणी करतात. त्यामुळे तुम्ही देखील माझ्यासारखे शांत न राहता विरोधकांना जशास तसे उत्तर द्यावे असे आवाहन केले. मी जिल्ह्याच्या विकासासाठी शासन दरबारी प्रयत्न करून वेगवेगळे प्रकल्प राबविण्यासाठी मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहील असे सांगितले. उजनीचे पाणी धाराशिवला आणण्यासाठी ज्यावेळी प्रयत्न सुरू केले. त्यावेळी देखील विरोधकांनी आमच्यावर जोरदार टीका करीत एक प्रकारे थट्टाच उडवली होती. मात्र, आम्ही त्याकडे दुर्लक्ष करीत सातत्याने प्रयत्न करून ते पाणी धाराशिवकरांना आणून दिल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या शहरातील रस्ता व इतर विकासाची कामे सुरु असून ती लवकरच पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापुढे जिल्ह्यात वेगवेगळे उद्योग आणून तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगत ते म्हणाले की, महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून त्यापैकी काही कामे मार्गी लावली तर काही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी नमूद केले. विरोधक फक्त बोलबच्चन करण्यात मग्न असून जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने कोणतेही त्यांच्याकडे नियोजन नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. तर जिल्हाध्यक्ष कुलकर्णी म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीमध्ये धाराशिव नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा कुठल्याही परिस्थितीत आपल्याला फडकवायचा आहे. प्रत्येकाला सोबत घेऊन त्यांचा विकास करण्यासह स्वयंरोजगार कसा मिळेल यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर कुणाल निंबाळकर यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील हे निवडून आले. महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्षांनी त्यासाठी मेहनत घेतली. मात्र, निवडणुका होताच महाविकास आघाडीचा धर्म धाब्यावर बसवून ठेवत त्यांनी ते दोघेजण कोणत्याही नेत्याला किंवा कार्यकर्त्यांना विचारत नाहीत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे मनमानीपणा करीत असून हे एकाही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला निर्णय प्रक्रियेत विचारात घेत नसल्याची टीका त्यांनी केली. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अन्य ॲप्सवर शेअर करा