पूरबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता घेणार
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची माहिती
धाराशिव दि १ ऑक्टोबर (जिमाका) जिल्ह्यात २१ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील काही भागात पूर परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात शेतीचे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले.जीवित व वित्तहानी देखील झाली असून ८ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.अनेक पाळीव जनावरांचे देखील प्राण गेले आहे. पूरबाधित गावातील कोणताही शेतकरी व नागरिक हा मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन काळजीपूर्वक व पारदर्शक पद्धतीने काम करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली.
आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री.पुजार बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनुप सिंगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री पुजार म्हणाले की,अनेकांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी पूर परिस्थिती बघितली आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने तीन दिवस काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यात आले आहे. पुराच्या पाण्याने बाधित झालेल्या ३१४९ कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करणे सुरू आहे. तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडून झालेल्या नुकसानीची सर्वेक्षण करण्याचे काम करण्यात येत आहे.त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर नेमके किती नुकसान झाले आहे,याची माहिती मिळणार आहे. नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहे.५ ऑक्टोबरपर्यंत हे पंचनामे पूर्ण करण्यात येतील.जुलै ते ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या पीक नुकसान भरपाईसाठी १८९ कोटी रुपये रक्कम राज्य शासनाकडून प्राप्त झाली आहे.संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती श्री.पुजार यांनी यावेळी दिली.
अशा प्रकारची परिस्थिती भविष्यात उद्भवल्यास कमीत कमी नुकसान कसे होईल नुकसान होईल,यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील असे सांगून श्री.पुजार म्हणाले की,पूरपरिस्थिती कमी झाली असून पुरांचे पाणी ओसरत आहे. ग्रामीण भागातील अनेक पुलांची उंची कमी असल्यामुळे दळणवळण व्यवस्था कोलमडली.या पुलांची उंची वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल.पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध कंपन्या व बँकांच्या सीएसआर निधीतून मदत करण्यात येईल. त्यांना पूरग्रस्त गावांना दत्तक घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.त्यासाठी सीएसआर कॉन्फरन्स लवकरच घेण्यात येईल.पूर ओसरला असला तरी पूरबधित गावांमध्ये रोगराई पसरू नये यासाठी रोगराई प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.सेवाभावी संस्थांनी पुरबधित गावांमध्ये परस्पर जाऊन मदत वाटप न करता तालुका प्रशासनाच्या समन्वयातून मदत वाटप करावी.पाळीव जनावरांसाठी मुरघासचा पुरवठा करण्यात येत आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या गुरांसाठी मोफत चाऱ्याचा पुरवठा करणार असल्याची माहिती श्री.पुजार यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यातील ४२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असल्याचे सांगून श्री.पुजार म्हणाले की,नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. गावपातळीवर यंत्रणा समन्वयातून काम करत आहे.जिल्ह्यातील पूरग्रस्त सर्व गावांशी संपर्क झाला आहे.यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी बाधित गावात पोहोचून काम करत आहे.शेतकऱ्यांनी या कठीण परिस्थितीत निराश न होता आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये.शासन व प्रशासन भक्कमपणे आपल्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडून सामाजिक व आर्थिक नुकसानीची माहिती गोळा करण्यात येत असल्याचे सांगून श्री. पुजार म्हणाले की, वेगवेगळ्या सेवाभावी संस्था,बँका व दानशूर व्यक्ती पूरग्रस्त भागासाठी मदत करत आहे. असे ते म्हणाले.
डॉ.श्री.घोष म्हणाले की,गावांमध्ये आरोग्य विभागाकडून रोगराई प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. पूरग्रस्तांची दैनंदिन आरोग्य पथकांकडून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रत्येक गावात २ ऑक्टोबर रोजी आयोजित ग्रामसभेतून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.पाण्याचे किती स्त्रोत दूषित झाले आहे,हे तपासून उपाययोजना करण्यात येतील.ज्या पाणीपुरवठा योजना दूषित झाल्या आहे,त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येतील.ज्या शाळांचा शालेय पोषण आहार पाण्यामुळे संपूर्णता भिजला आहे, त्या शाळेला शेजारच्या शाळेतून पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या ज्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्याच्या दुरुस्तीसाठी किती निधी लागणार आहे, याची माहिती घेऊन त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद करण्यात येणार असल्याचे डॉ.घोष यांनी यावेळी सांगितले.या पत्रकार परिषदेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.