गडपाटी, धाराशिव : डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल अंतर्गत असलेल्या आर. पी. औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयामध्ये जागतिक औषध निर्माता दिन व शिक्षक दिन एकत्र साजरा करण्यात आला. या दोन्ही महत्त्वपूर्ण दिवसांचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम डॉ. प्रतापसिंह जी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.
जागतिक औषध निर्माता दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण रक्षणाचा संदेश देत विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी यांनी भूषविले. त्यांनी विद्यार्थ्यांना औषधनिर्माण क्षेत्रातील भावी संधी व आव्हाने याबद्दल मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या निमित्ताने विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी कु. शिवानी येडे व कु. मधुलक्ष्मी थोरात यांनी केले, तर प्रा. विजय सुतार यांनी समन्वयकाची भूमिका बजावली. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळे कार्यक्रमाला उत्साही वातावरण लाभले.