धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे, सोयाबीन, कांदा, उडीद, तूर, उस तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांना १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी यासह इतर विविध मागणीसाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.३ ऑक्टोबर रोजी तीव्र आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यासह विविध भागात अतिवृष्टी व पूर याने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यात माणसे, जनावरे, उभे पीक मातीसह वाहून गेले आहे. तर काही जनावरे दावणीलाच मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना या आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी प्रती हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांना प्रती हेक्टरी १ लाख रुपये अनुदान देण्यात यावेत. तर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. तसेच सरसकट कर्जमाफी करण्यात यावी. त्याबरोबरच सोयाबीनला ६ हजार रुपये हमीभाव देण्यात यावा. विशेष म्हणजे कापणी प्रयोग रद्द करुन सरसकट पीक विमा देण्यात यावा. तर
उडीद काढणीनंतर ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या कांदा पिकांची लागवड करुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उडीद व कांद्याची एकत्रित मदत देण्यात यावी. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विचारात न घेता १५ रुपये शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कपास करण्याचा निर्णय मागे घ्यावा आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड धीरज पाटील, जिल्हा मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, प्रदेश सचिव पांडुरंग कुंभार, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सयाजी देशमुख, प्रकाश चव्हाण, बालाजी बंडगर, विलास शाळू , शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, डी.सी.सी.बँकेचे संचालक मेहबूब पाशा पटेल, बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, परांडा तालुकाध्यक्ष हनुमंत वाघमोडे, लोहारा तालुकाध्यक्ष शामसुंदर तोरकडे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष आयुब पठाण, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, अशोक बनसोडे, सरफराज काझी, सुरेंद्र पाटील, अशोक शेळके, अमोल कुतवळ, युवक काँग्रेसचे धवलसिंह लावंड, मोइज सय्यद, कफील सय्यद, महिला जिल्हा कार्याध्यक्ष तनुजा हेड्डा, शीलाताई उंबरे, अंजली ढवळे, प्रभाकर लोंढे, मौलाना शौकत सय्यद, संजय देशमुख, अभिमान पेठे, समियोद्दीन काझी, अमोल पाटील, सिराज मोगल, बाबा घुटे, कालिदास खैरे, राजेश शिंदे, मुहिब शेख, बसवराज पाटील, सुधीर गव्हाणे, सलमान शेख, प्रशांत शिंदे, प्रदीप गवारे, संतोष जगताप यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.