रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळेना , संतप्त गावकरी उतरले रस्त्यावर , बेशरमाची झाडे लावून केले आंदोलन.
सांगवी (का) : तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) ते पांगरदरवाडी या तीन किलोमीटर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे नेहमीच या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत असून अपघातामुळे अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.
तर अनेकजण मणक्याच्या दुर्धर आजारांनी ग्रस्त आहेत. वारंवार रस्त्याची मागणी करुनही रस्ता होत नसल्यामुळे येथील संतप्त नागरिकांनी शनिवार दि.18 जुलै रोजी रस्त्यावरील खड्यात बेशरमाची झाडे लाऊन प्रशासनाचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले. सांगवी (काटी) ते पांगरदरवाडी हा तीन किलोमीटरचा रस्ता वीस वर्षापूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजने मधुन तयार करण्यात आला होता. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले असुन वाहनधारकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. दळणवळणासाठी हा प्रमुख मार्ग असल्यामुळे येथील नागरिकांची नियमित या रस्त्यावर वर्दळ असते. बँक, पोलिस स्टेशन इत्यादी महत्वपूर्ण कामासाठी येथील नागरिकांना या रस्त्यावरुन ये-जा करावी लागते.
रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकदा लहान-मोठे अपघात झाले आहेत. गरोदर महिलांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन जाणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खराब रस्त्यामुळे पांगरदरवाडीची बस सेवा गेल्या 10 वर्षांपासून बंद आहे. सध्या 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु झाल्या असून विद्यार्थ्यांना रस्त्यावरून ये-जा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. संबंधित मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेकडे गावकऱ्यांनी तक्रारी केल्या असता रस्ता हा रस्ता मंजूर असून याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे गावकऱ्यांना सांगीतले जात आहे. या रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी केली आहे. यावेळी भाजपचे युवा नेते सोमनाथ शिंदे, महेश सावंत, बापू साळुंके, शिवाजी कदम, आण्णा मोरे, भैरु टिंगरे, संजय क्षिरसागर, भैरु चव्हाण, सुरज मते, अमीर शेख, इकबाल सय्यद, महादेव गायकवाड यादि गावकरी उपस्थित होते.