google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रेम वात्सल्याचा खळाळता झरा हरवला

प्रेम वात्सल्याचा खळाळता झरा हरवला

0

प्रेम , ममता, वात्सल्य ,सेवावृत्ती , आपुलकीचा अखंड खळाळता झरा आणि अनाथ लेकरांवर पोटच्या गोळ्यापेक्षाही जास्त जीवापाड प्रेम करणारी , त्यांची निस्वार्थ भावनेने सेवा करून नवजीवन देणारी माय माऊली म्हणजेच 'माई' अर्थातच 'सिंधुताई सपकाळ' या होत . त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा जिल्ह्यातील पिंपरी (मेघे) या छोट्याशा गावी झाला.त्यांचं जन्मतः चिंधी नाव ठेवण्यात आलं. चिंधी अभिमानजी साठे हे जन्मनाव.  वयाच्या12 व्या वर्षी वयाने 26 वर्षे मोठ्या असणाऱ्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी त्यांचा विवाह झाला . त्या सौ.चिंधीबाई श्रीहरी सपकाळ  झाल्या.नवरगाव हे सासर . ज्या घरात पाऊल ठेवलं त्या घरात कोणी शिकलेले नव्हते. नवराही गुराखी . तोही काळजी घेत नसे . पहिली तीन मुले झाली . तरीही आयुष्यात सुख समाधान नाही . तिथेही त्यांच्या वाट्याला हालअपेष्टा आल्या.घरात नवऱ्यानेही छळ सुरू केला. घरातील इतर लोकांनीही त्रासात भरच घातली .उपाशी ठेवणे दारिद्र्य,वेदना,भूक,उपासमार,परिस्थितीचे चटके  लहानपणापासून त्यांच्या वाट्याला आलेले. जुलूम सहन करतच परिस्थितीशी दोन हात करत , हार न मानता लढत राहिल्या .उपजतच काही व्यक्तीच्या वाट्याला हालअपेष्टा ,वेदनेनं भरलेलं आयुष्य येतं. जीवनाचा शेवट करावा , जगूच नये असं वाटू लागतं. त्यात कमजोर मनाची माणसं स्वतःला झोकून देतात,आत्महत्या करताना आपण अवती-भवती पाहतो आहोतच . त्याही आत्महत्या करायला निघालेल्या.त्या सांगतात,आता प्रहररात्र उलटली होती.मरायची तयारी झाली होती.बस्स थोडा अवधी होता .गाव शांत झोपला होता.अधून मधून टिटवी तेवढी टिर्र टिर्र करून शांततेचा भंग करत होती.जणू तीही मला सुचवित होती.घाई कर ,लवकर मर,खरंच लवकर मर.
 "आता नजर पैलतीराकडे लागली होती.डोंगराचा प्रचंड कडा माझी वाट पहात होता.संपुर्ण मोह आवरून मीही निघालेच होते.जाता जाता मुलीच्या कोवळ्या गालावरती मी माझे ओठ टेकले.मात्र नकळत डोळ्यातील कढत पाणी तिच्या गालावर पडले...अन माझ्या बाळीने दिलखुलास हंबरडा फोडला.
       कुण्या अबलेचे प्रेत निपचित होते|
       बिलगुण तिला चिमुकले पीत होते|
असं दृश्य डोळ्यापुढं आलं आणि मी मरण कॅन्सल केलं."असं माई सांगतात.
दुसरा प्रसंग,
त्यांच्या समोर वेदनेने पाण्याच्या घोटासाठी तडफडत असलेला जीव नजरे समोर येतो,दोन घोट पाणी दे गं माय म्हणतो. माई त्याच्या तोंडात पाणी टाकतात ,तो पाणी पितो आणि मरतच नाही . किती वेगळा प्रसंग नाही.त्याक्षणी त्या क्षणभर विचार करतात .जगण्यासाठी मानवी जीव तळमळत आहे आणि मी मृत्युचा विचार करत आहे . छे मी मरणार नाही ! असा संकल्प करतात. आयुष्यभर अनाथांच्या कल्याणासाठी देह झिजवतात.समाजसेवेचा संकल्प करून , जगण्याची नवी उर्मी मनात घेऊन आयुष्यभर अनाथ लेकरांची सेवा करत राहतात.मनामध्ये नवी दिशा,नवी ऊर्जा घेऊन कधी गो मातेच्या रक्षणासाठी तर आदिवासी बांधवांवरील अन्याय अत्याचाला न्याय मिळावा यासाठी देह झिजवतात. माईंचं शिक्षण तरी किती झालेलं , अवघे चार इयत्ता शिकलेल्या.ना मोठी पदव्यांची सामग्री सोबत ना आर्थिक सुबत्ता . आजही आम्ही पांढरपेशा वर्गातील माणसं  स्वाभिमानाला ,इभ्रतीला सांभाळून चालणारे. लोकांच्या पुढे हात पसरण्यासाठी आम्ही धाडस करू शकणार ही नाही. हात पसरण्यासाठी हजारदा विचार करणारे . माई तुम्हाला हे कसं शक्य झालं ? माई तुम्ही झोपडीत,मंदिरात , रेल्वे स्टेशन , झोपडपट्टी वस्त्यांमध्ये भीक मागत राहिलात .कोणासाठी ? या अनाथ लेकरांच्या कल्याणासाठीच ना? आज ती लेकरं डॉक्टर , इंजिनिअर , प्राध्यापक , शिक्षक , उद्योजक आणि समाजसेवक सुध्दा झालीत हो ! ही तुमचीच पुण्याई . तुम्हाला अनेक  पुरस्कारांनी सन्मानित केलं , नुकताच ' पद्मश्री ' पुरस्कार ही मिळाला .पण तुम्ही स्वतःला प्रसिद्धीच्या गराड्यात झोकून दिलं नाही.आम्ही एक पुरस्कार मिळाला की हुरळून जातो.पण तुम्ही प्रसिद्धीपासून अलिप्त राहिलात .प्रसिद्धीची गरजच नव्हती तुम्हाला , तुम्ही कामाच्या माध्यमातून कर्तृत्व दाखवून दिलंत.माणसाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी  मानवसेवेचा  मार्ग अंगीकारलात आणि त्याच सत्याच्या वाटेने ,निष्ठेने अखंड चालत राहिलात .वेळेची  तमा न बाळगता . रस्त्यावर वेळप्रसंगी गाणे गायले,भीक मागितली कित्येकांनी मदतीचा हात नाकारला,हाकलून दिलं.पण तुम्ही तेही सहन केलं . मान अपमानही मानला नाही, धीर सोडला नाही .रणांगणातून पळ काढला नाहीत. पुन्हा नव्या उमेदीने दुसऱ्या ठिकाणी गाणे गायले,व्याख्यानं दिलीत आणि पदर पसरून लेकरांसाठी मदत मागत गेलात .त्याला भीक तरी कसं म्हणावं ? म्हणता येईल का ? तर नक्कीच नाही . रस्त्यावर सोडलेल्या अभागी जीवाचे पालनपोषण करायला निघालेली ही माय माऊली.त्यांच्या आत्मोद्धारासाठी आयुष्यातील कणकण वेचते .तुम्ही पोटाची आग शमविण्यासाठी पेटत्या चितेच्या निखाऱ्यावर भाकरी भाजून खाल्ली . कुठून  आली ही शक्ती. तुम्हाला भुताखोतानं कसं पछाडलं नाही.ऐन तारुण्यात वयाच्या 22 व्या वर्षीच घर सोडलेलं. त्यांनाही विखारी विकृतीचा सामना करावा लागला.परंतु त्या सांगतात,मी कुलीन घरातील होते.माझ्यावर लहानपणापासूनच चांगले संस्कार झालेले होते.त्या प्रसंगाला घाबरून मागे वळून पाहत बसले नाही . नऊवारी साडी ,डोक्यावर पदर असा माईंचा पोशाख . माई जगातील 22 देशात गेल्या, तिथं व्याख्याने दिली . झपाटलेल्या अवस्थेत काम करत राहिल्या.कुठून आली ही दुर्दम्य इच्छाशक्ती . तुमच्या इच्छाशक्तीपुढं नियतीला ही शरण जावं लागलं,हार मानावी लागली.राजमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा इतिहास आपल्याला सर्वश्रुतच आहे. त्याही संघर्षाची वाटच चालत राहिल्या. त्यांचं इतिहासाच्या पानावर सुवर्णअक्षरांनी नाव कोरलं. त्यांना त्रास कोणी दिला ? कामात व्यत्यय कोणी आणला ? त्या संघर्ष कोणासाठी करत होत्या ? याचा विचार आम्ही करणं गरजेचं आहे . समाजाला न्याय मिळावा म्हणून संघर्ष होता आणि समाज येनकेन प्रकारे त्रास देतच होता .त्यांनी घाबरून माघार घेतली नाही,समाजकार्य थांबवलं नाही.आज त्याची गोड फळे आम्ही चाखतो आहोत.आज माई आपल्यात नाहीत असं  म्हणता येईल का ? तर नक्कीच नाही. हजारो जीवांचा आधार हरवला असला तरी त्यांनी केलेलं कार्य अतुलनीय आहे. हरलो की तिथंच प्रवास संपवणारी अनेक लोक अवतीभवती दिसून येतात.परंतु  "जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती,देह कष्टविती परोपकारे " या उक्तीप्रमाणे आपलं जीवन इतरांच्या सेवेसाठी समर्पित करणारी आणि "मानव सेवा हीच ईश्वर सेवा"समजून अखंड आयुष्य समाज सेवेसाठी वाहणारी काही थोडक्याच विभूती आपल्याला दिसून येतील.  पृथ्वीवरील मानव जन्म एकदाच भेटणार आहे,हा जन्म पुन्हा नाही. त्याचं आपण सोनं केलं पाहिजे.हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेऊन थोडक्याच विभूती त्या वाटेवरून वाटचाल करताना दिसून येतील.त्यातच आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात ,धावपळीच्या ,दगदगीच्या काळात मानव आप्तस्वकीय विसरून गेला आहे.आजही अनेकांना जन्मदात्यांचा  विसर पडलेला दिसून येतो , अनेक जन्मदाते लेकरांना  बेवारस सोडून देतात. अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम वाढताहेत . कशामुळे ? याला जबाबदार कोण ? ज्यांनी पोटच्या गोळ्यांना बेवारस  सोडून दिलं , त्या अनाथ बाळांची  माय होतात.त्यांचं मातृत्व त्या स्वीकारतात.त्यांच्या प्रेमात कमतरता भासू नये म्हणून स्वतःची मुलगी दुसऱ्या अनाथाश्रमात देतात.हा किती मोठा त्याग? आणि समर्पणाची भावना .हे बळ आलं कोठून? मी आणि माझे यात गुंतून गेलेलो आम्ही.याची कल्पना करू शकतो ?
      ' मला  जाळू नका..मातीत गाडून टाका" या कवितेत आयुष्याचे मर्म त्या उलगडत जातात . त्या म्हणतात,
"खरंच.. मी जेव्हा जमीनदोस्त होईन
 सोबत काय येईल, मागे काय राहील?
दुर्देवाचे खडक फोडले, दुःख वाहीलं मूर्तिमंत उभं आयुष्य गेलं,  ना खेद ना खंत
 ह्यातूनच नवी पहाट, उद्याच स्वप्न पाहिलं ||
अनेकांना जवळ  केलं,  देताआलं तेवढं दिलं आता थकलेत रस्ते, मनही खुणावते धीरे आस्ते संपेल आयुष्याचे तेल, पणती विझून जाईल ||
सातपुडा उरी फुटेल 
     चिखलदऱ्याचा धीर सुटेल
       वासराच्या गाई हंबरतील
        पशुपक्षी 'भैरवी' गातील
      स्तब्ध होतील वादळवरे 
       कडे कपारी, आणि झरे
 दुरावलेल्या भाग्याचं मी 'अहेव' लेणं लेईल मातीचा पदर पांघरून मला 'धरती' पोटात घेईल.

मातीची शाल पांघरूण धरती पोटात घेऊन माई आज शांत निद्रा घेत आहेत. त्यांच्या कार्यास व त्यांच्या विनम्र पावन स्मृतीस अभिवादन करतो.

प्रेम वात्सल्याचा खळाळता झरा हरवला -   प्रा.डॉ.तुळशीराम उकिरडे
               सहाय्यक प्राध्यापक,मराठी विभाग,
               तेरणा महाविद्यालय,उस्मानाबाद
                   9881103941


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top