धाराशिव, दि. 5 -
शासन आणि जनतेमधील महत्वाचा दुवा असलेल्या महसूल प्रशासनावर मोठी जबाबदारी आहे. शेतरस्ते, विविध योजनांचे लाभ, महसूली नोंदीचे हक्क, शेतसारा, अशा एक ना अनेक कामांच्या माध्यमातून महसूल विभागाचा सर्वसामान्यांशी थेट संबंध येतो. नागरिकांच्या मालमत्तेच्या नोंदी, महसूल वसुली व विविध योजनांच्या माध्यमातून महसूल प्रशासनाने प्रभावी काम केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसुली सेवा पारदर्शी आणि तत्पर असल्याने विविध योजनाचा लाभ नागरिकांना मिळाला आहे.
धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,उपजिल्हाधिकारी निवडणूक शिरीष यादव, अपर्णा गायकवाड, भूमचे उपविभागीय अधिकारी प्रभारी जयवंत पाटील, कळंबचे उपविभागीय अधिकारी संजय पाटील धाराशिवचे उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, धाराशिव तहसीलदार डॉ.
मृणाल जाधव, तहसीलदार जयवंतराव पाटील,तहसीलदार अरविंद बोलंगे,तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब व तहसीलदार, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील, कोतवाल व महसूल विभागातील सर्व कर्मचारी नागरिकांना सेवा देण्यासाठी कार्यरत आहेत.
राज्य सरकारच्या आदेशानंतर धाराशिव जिल्ह्यात 14 हजार 67 कुणबी प्रमाणपत्रांसाठी अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 13 हजार 837 कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. तर अपूर्ण कागदपत्रांमुळे 230 अर्ज नाकारण्यात आले आहेत. जिल्ह्यात कुणबी असलेल्या नोंदींची संख्या 43 लाख 63 हजार 647 आहे. त्यापैकी कुणबी नोंदणीची संख्या चार हजार 819 असून ती पूर्णपणे स्कॅन करण्यात आली आहेत. जिल्ह्यात 130 गावांमध्ये कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
विद्यार्थी तसेच नागरिकांना शासकीय, शैक्षणिक आणि विविध कारणांसाठी जात, उत्पन्न व रहिवाशी प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. धाराशिव जिल्हा महसूल प्रशासनाच्यावतीने जात प्रमाणपत्रासाठी 21 हजार 470 अर्ज आले होते. पैकी 18 हजार 897 जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले. प्रलंबित असलेल्या अर्जांची संख्या 240 आहे. उत्पन्न प्रमाणपत्रासाठी 71 हजार 561 अर्ज आले. त्यापैकी 68 हजार 148 प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. तर 789 अर्ज प्रलंबित आहेत. तसेच रहिवाशी प्रमाणपत्रासाठी 12 हजार 498 लाभार्थ्यांचे अर्ज आले. त्यापैकी 12 हजार 154 प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. तर 151 अर्ज प्रलंबित आहेत.
ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतरस्त्यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अतिक्रमणमुक्त रस्ते आणि नवीन बांधावरून रस्ते देण्याची मोहिम महसूलने हाती घेतली आहे. यातून अतिक्रमण झालेले 223 रस्ते खुले करून देण्यासाठी अर्ज आले आहेत. पैकी 157 रस्ते खुले करून देण्यात आले आहेत. तर 76 प्रकरणांमध्ये सुनावणी सुरू आहे. नवीन शेतरस्त्यासाठी 205 अर्ज आले होते.
पैकी 145 नवीन रस्ते देण्यात आले असून या रस्त्यांपैकी 121 रस्त्यांची सातबारा उतार्याच्या इतर अधिकारांमध्ये नोंद घेण्यात आली आहे.
शेतकर्यांना विविध योजनांचा थेट लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारने अॅग्रीस्टैक योजना अंमलात आणली आहे. प्रत्येक शेतकर्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. यात धाराशिव जिल्ह्यात एकूण खातेदारांची संख्या चार लाख 77 हजार 44 आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या तीन लाख दोन हजार 940 आहे. अॅग्रीस्टैकसाठी जिल्ह्यात तीन लाख 46 हजार 291 नोंदणी करण्यात आली आहे.
मालमत्तांच्या हस्तांतरणाचे नोंदणीकृत व्यवहार महसूल दप्तरी नोंदविण्यासाठी फेरफार रजिस्टर असते. मालमत्तेच्या हस्तांतरणाचा दस्त नोंदणीकृत केल्यास ई-चावडीच्या माध्यमातून आक्षेप, हरकतींसाठी ते प्रसिध्द केले जातात. पूर्वी ही प्रक्रिया ऑफलाईन होती, आता ती ई-चावडीच्या माध्यमातून ऑनलाईन केली आहे.
यात धाराशिव जिल्ह्यातील एकूण 720 गावांच्या सज्जांचा समावेश आहे. गाव नमुन्यांमध्ये केलेल्या एकूण नोंदीची संख्या 20 हजार 725 आहे. यात 100 टक्के मागणी निश्चिती केलेल्या गावांची संख्या 696 आहे. तर 100 टक्के वसुली झालेल्या गावांची संख्या नऊ आहे. मार्चअखेर ई-चावडीवर पाहण्यासाठी फेरफार उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या 32 हजार 709 इतकी होती. तर मार्च 2025 अखेर 20 हजार 554 ई-फेरफारांची संख्या आहे.