राष्ट्रीय महामार्ग क्र.६५ जुना ९ साठी संपादित केलेल्या जमीनीचा मावेजा द्या - मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
१२ ऑक्टोबर पासून ग्रामपंचायत दाळींब समोर बेमुदत धरणे आंदोलन
उस्मानाबाद : मनसेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्र.६५ जुना ९ साठी संपादित केलेल्या व मावेजा न मिळालेले शेतकऱ्यांची ४.९९ हेक्टर जमीन त्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यात यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की उमरगा तालुक्यातील दाळींब येथील शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ जूना च्या चौपदरी करण्याच्या संपादनासाठी जमीनी संपादीत करण्यात आल्या आहेत. परंतू साल सन १९८९ साली भुसंपादन विभाग, तत्कालीन उपजिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकारी यांच्या गलभान कारभारामुळे दाळींब येथील शेतकरी व गावठाण मधील जमीनी ४.९९ हेक्टर जमीन हायवेसाठी संपादित करून शेतकऱ्यांच्या सातबारा उतारा वरून कमी करण्यात आलेली आहे. परंतू ती जमीन हायवेकडे वर्ग करण्यात आलेली नाही. ४.९९ हेक्टर जमीन ही जमीन ना शेतकऱ्यांच्या नावावर आहे ना हायवेच्या संपादन अंशात आहे. त्यामुळे या जमीनीचा मावेजा शेतकऱ्यांना मिळालेला नाही, या बाबतीत संबंधीत शेतकऱ्याने वेळोवेळी संबंधीत विभागात तकारी अर्ज देऊनही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. या बाबतीत आपल्या स्तरावरून संबंधित विभागातील कागदपत्राची सखोल चौकशी करून एकतर त्या शेतकऱ्यांना त्या जमीनीचा मोबदला द्यावा किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांच्या नावावरील क्षेत्र कमी करण्यात आले आहे. ते क्षेत्र शेतक-यांच्या नावे परत सातबारा पर नोंद करून द्यावा या मागणीसाठी दि.१२ ऑक्टोबर पासून ग्रामपंचायत कार्यालय दाळींब समोर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याच इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष शाहूराज माने व दिलीप गरड,नेताजी मोरे, रणजित राजपूत, शिवाजी सारणे,कमाल शेख यांच्यासह अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


