प्रधानमंत्री शिष्यवृत्ती मिळण्यासाठी माजी सैनिकांच्या पाल्यांना आवाहन
उस्मानाबाद,दि.12(जिमाका):- जिल्ह्यातील माजी सैनिक,विधवा,अवलंबित यांना कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती मिळण्यासाठीची प्रकरणे ही www.ksb.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सादर करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.
इयत्ता बारावी किंवा पदवीका (डिप्लोमा) मध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या आणि प्रथम किंवा द्वितीय वर्षासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दि.01 एप्रिल ते 15 नोव्हेंबर या कालावधीत प्रवेश घेतलेल्या (कोर्सेसची यादी ऑनलाईन पहावी) माजी सैनिकांच्या पाल्यास मुलीस 36 हजार रुपये आणि मुलास 30 हजार रुपये एवढी वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते.
ऑनलाईन भरलेल्या अर्जाची हार्डकॉपी आणि उर्वरित कागदपत्राची छायांकित प्रत काढून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे सादर करावी. ऑनलाईन फॉर्म भरण्याची कार्यवाही सुरु असून शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 अशी आहे. सुधारित जोडपत्र 1,2 आणि 3 (2022-23) आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची सविस्तर माहिती के.एस.बी.च्या संकेतस्थळावर (www.ksb.gov.in ) उपलब्ध आहे. अधिक माहितीस्तव या कार्यालयात संपर्क करावा.
तरी पात्र व इच्छुक माजी सैनिकांच्या पाल्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार (नि.) यांनी केले आहे.


