दोन दिवसीय महाआरोग्य शिबिराची तयारी पूर्ण आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते आज उद्घाटन

0

दोन दिवसीय महाआरोग्य शिबिराची तयारी पूर्ण
आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते आज उद्घाटन


 उस्मानाबाद, दि. 26 - परंडा येथील कोटला मैदानावर आयोजित दोन दिवसीय महाआरोग्य शिबिराची तयारी पूर्ण झाली आहे. विविध आजारांची तपासणी व उपचार विभागात जवळपास पाच लाख रूग्णांवर होेणार आहेत. त्याअनुषंगाने लागणारे सर्व वैद्यकीय साहित्य, औषधे व सोयी-सुविधा उभारण्यात आली आहे. रविवारी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते व राज्यातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन होणार आहे.


आरोग्य विभाग आणि आर. के. एचआयव्ही एड्स रिसर्च अ‍ॅन्ड केअरिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने परंडा येथील कोटला मैदानावर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात भूम, वाशी, परंडा, सोलापूर, माढा, करमाळा, लातूर, बीडसह परिसरातील नागरिक सहभागी होणार आहेत. या शिबिरासाठी अठराशे डॉक्टर व इतर कर्मचारी रूग्णांची नोंदणी, तपासणी व आवश्यक ते उपचार करणार आहेत. यासाठी कोटला मैदानावर मंडप, व्यासपीठ, विविध तपासणी कक्ष, भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था, नोंदणी कक्ष, वाहनतळ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. 

शिबिरस्थळी रूग्णांना घरापासून आणण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांच्या अल्पोपहार व भोजनाचीही व्यवस्था शिबिराच्या ठिकाणी करण्यात आली आहे. त्यामुळे या शिबिराला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळेल, अशी आशा संयोजकांनी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top