ढोकी येथील एसबीआय बँकेत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पीक कर्ज वाटपाचा आढावा
उस्मानाबाद,दि.14( प्रतिनिधी):- उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आज पीक कर्ज वाटप संदर्भात आढावा बैठक घेतली.
यावेळी प्रियंवदा म्हद्दलकर (भा.प्र.से.), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी श्री.असलकर, तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे, ढोकी एसबीआय शाखेचे व्यवस्थापक अभय टिचकुले, तालुका कृषी अधिकारी श्री.जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी बँकेत उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या, अडी-अडचणी जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. किती प्रमाणात कर्ज वाटप झाले आहे? याचा आढावा देखील डॉ.ओम्बासे यांनी यावेळी घेतला. बँक कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांशी सु-संवादातून संपर्कात राहण्याचा प्रयत्न करावा, शेतकऱ्यांना सहकार्य करावे, वेळेवर कर्ज पुरवठा कसा होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे अशाही सूचना यावेळी जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी बँक अधिकारी – कर्मचाऱ्यांना दिल्या.


