केंद्रीय पथकाकडून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी शेतकरी आणि ग्रामस्थांशी साधला संवाद

0
 


केंद्रीय पथकाकडून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी शेतकरी आणि ग्रामस्थांशी साधला संवाद


धाराशिव दि.13 ):- जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या पथकाने आज 13 डिसेंबर रोजी धाराशिव आणि लोहारा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.धाराशिव तालुक्यातील करजखेडा महसूल मंडळातील ताकविकी आणि करजखेडा,लोहारा तालुक्यातील मार्डी,धानोरी,माळेगाव व लोहारा शहरानजीकच्या शिवारातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.

           या पथकाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवादही साधला.चालू वर्षी खरीप हंगामात सोयाबीन पिकाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी किती बियाणे पेरले होते,किती खर्च आला आणि आता जनावरांच्या चाऱ्याची काय व्यवस्था आहे.तसेच येणाऱ्या काळात काय नियोजन केले आहे,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांची मागणी केली आहे का अशी विचारणा उपस्थित शेतकऱ्यांना पथकातील सदस्यांनी केली.

           केंद्रीय पथकाने जिल्ह्यात उदभवणाऱ्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीविषयी आवश्यक त्या नोंदी करून आपला अहवाल केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याचे सांगितले.या पथकामध्ये केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाचे सहाय्यक आयुक्त श्री.मोतीराम,केंद्रीय आपत्ती निवारण मंत्रालयाचे उपसचिव श्री.मनोज कुमार,नीती आयोगाचे संशोधन अधिकारी श्री.शिवचरण मीणा यांचा समावेश आहे.

             केंद्रीय पथकाने शिवारातील पाणीपुरवठ्याच्या विहिरीची पाहणी केली.पाण्याची खालावत चाललेली पातळी याबद्दल ग्रामस्थांशी चर्चा केली.लोहारा (बु) शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देऊन उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली.तसेच पथकातील सदस्यांनी शासनाच्या योजनांबाबत तसेच मिळणाऱ्या विविध योजनांच्या लाभाबाबत उपस्थित शेतकरी आणि ग्रामस्थांकडून माहिती घेतली.

            यावेळी पथकासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,विभागीय कृषी अधीक्षक महेश तिर्थकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. यतीन पुजारी,धाराशिव उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे,उमरगा उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार शिवानंद बिडवे व कृषी उपसंचालक अभिमन्यू काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top