धाराशिव प्रतिनिधी :
व्ही पी एज्युकेशनल कॅम्पस, छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थापक अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. वेदप्रकाश पाटील यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट प्रचंड घडामोडींनी भरलेला आहे. अवघ्या सोळाव्या वर्षी सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र करून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी सर्वधर्मसमभाव जपत आदर्श राज्यकारभार उभारला. लढायांमध्ये गनिमी काव्याचा प्रभावी वापर करून शत्रूला चकवा दिला. महिलांविषयी व्यापक आणि सन्मानपूर्वक दृष्टिकोन ठेवत अनेक अनिष्ट रूढी-परंपरा बंद केल्या.
शिवाजी महाराजांचा संघर्ष कोणत्याही धर्माविरोधात नसून वाईट प्रवृत्तीविरोधात होता, हे त्यांनी अधोरेखित केले. स्वराज्यात कोणतीही व्यक्ती बेरोजगार किंवा उपाशी राहणार नाही, अशी लोककल्याणकारी व्यवस्था त्यांनी निर्माण केली होती. आजच्या युवकांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन तो आचरणात आणावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.
कार्यक्रमास आर. पी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गाझी शेख, एस. बी. एन. एम. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे, एस. पी. पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमरसिंह कवडे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश लोमटे, वेलनेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्राचार्या डॉ. पूजा आचार्य, कृषी महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे, डेरी महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. बालाजी वाघमारे, आयटीआयचे व्यवस्थापक प्रा. डी. एम. घावटे, कॅम्पसचे लेखापाल योगेश मंडलिक तसेच सर्व महाविद्यालयांचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


