मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी जिल्ह्यातील प्रलंबित महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष न करता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घावे - आ.राणाजगजितसिंह पाटीलं
उस्मानाबाद :- भाजप तुळजापूर आमदार राणाजगजितसिंह पाटीलं यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन , पत्र लिहून अशी मागणी केली आहे....
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रलंबित अति महत्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष न करता सहकार्य करण्याबाबत...
जय महाराष्ट्र !
मराठवाडा मुक्ति संग्राम दिना निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा !! आपण मुख्यमंत्री होऊन २२ महिने उलटले आहेत. या कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्याच्या अति महत्वाच्या विषयांकडे ठाकरे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे, जिल्ह्यावर अन्याय होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे. जिल्ह्यातील जनतेने शिवसेनेला ३ आमदार व १ खासदार दिला हे आपणास ज्ञात आहे. तरी देखील आपण आजवर जिल्ह्यातील विकास कामांबाबत एकही व्यापक बैठक घेतलेली नाही हे दुर्दैवी वास्तव आहे. शिवसेनेच्या मंत्री महोदयांकडे अनेक विषय प्रलंबित आहेत व आपण हस्तक्षेप करून सहकार्य करण्याची मला नितांत आवश्यकता वाटते.
१. तांत्रिक कापड निर्मिती प्रकल्प (टेक्निकल टेक्स्टाईल पार्क) :
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सप्टेंबर, २०१९ मध्ये उस्मानाबाद येथील कौडगाव MIDC क्षेत्रात 'तांत्रिक कापड निर्मिती प्रकल्प (टेक्निकल टेक्स्टाईल पार्क)' ची औपचारिक घोषणा केली होती व MIDC ला निर्देश देऊन KPMG या बहुराष्ट्रीय कन्सल्टंसी फर्मच्या माध्यमातून प्राथमिक अहवाल तयार करून घेतला होता. MIDC ने राज्य सरकारची मान्यता घेऊन हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविणे अपेक्षित आहे. तद्नंतर यास ‘National Technical Textiles Mission’ या केंद्रिय योजने अंतर्गत सहकार्य मिळनार आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते व राज्याचे उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून देखील या विषयात थोडीसुद्धा प्रगती झालेली नाही. १०,००० पेक्षा जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेला हा प्रस्तावित प्रकल्प केवळ राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे प्रलंबित आहे.
२. सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद रेल्वे मार्ग :
आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नेटवर्कला जोडले जाईल ही घोषणा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी केल्यानंतर या प्रकल्पाला २०१९ साली रेल्वे बोर्डाने मान्यता दिली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या प्रकल्पाला राज्य सरकार ५०% निधी देईल हे मान्य केल्यामुळे जलदगतीने व खास बाब म्हणून या प्रकल्पाचे काम सुरु झाले आहे. शिवसेनेचे नेते व राज्याचे परिवहन मंत्री ना. अनिलजी परब यांच्याकडे वारंवार याबाबत पाठपुरावा करून देखील राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी एकही रुपयाची तरतूद करण्यात आलेली नाही. उस्मानाबाद शहरात रेल्वे जंक्शन होऊन अर्थकारणाला बळकटी मिळावी यासाठी देखील हा प्रकल्प महत्वाचा आहे.
३. तुळजापूर शहराचा 'प्रशाद' योजनेत समावेश करणे :
महाराष्ट्राची कुलस्वामिनी ज्यांचे आपण देखील निस्सीम भक्त आहात, त्या आई तुळजाभवानीच्या तीर्थ क्षेत्राचा परिपूर्ण विकास व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या 'प्रशाद' योजनेमध्ये समावेश होणे अत्यंत गरजेचे आहे. याचा प्राथमिक अहवाल राज्य सरकारने सादर करणे अपेक्षित आहे. शिवसेनेचे नेते व राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्याकडे आग्रही मागणी करून देखील या विषयात कुठलीही प्रगती झालेली नाही. केंद्र सरकार १००% अनुदान देणार असल्याने राज्य सरकारकडून केवळ प्राथमिक मागणी पत्राची आवश्यकता आहे.
४. वॉटर ग्रीड :
वारंवार भीषण दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 'वॉटर ग्रीड' योजना जाहीर करून निविदा स्तरापर्यंत आणलेला हा प्रकल्प जिल्ह्यातील जनतेसाठी अत्यंत गरजेचा आहे. निविदा प्रक्रिया थांबवून ठाकरे सरकार जिल्ह्यावर मोठा अन्याय करत आहे. शिवसेनेचे नेते व राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मला विधानसभेत आश्वासन देऊन देखील या विषयात सकारात्मक कृती केलेली नाही.
५. पीक विमा :
गतवर्षी ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या अभूतपूर्व नुकसानीची पाहणी करण्यासाठी आपण स्वतः आला होतात व शेतकऱ्यांना धीर देत “वाऱ्यावर सोडणार नाही” हा शब्द दिला होता. दुर्दैवाने ८०% बाधित शेतकरी आपल्या हक्काच्या पीक विमा रकमेपासून आजही वंचित आहेत. शिवसेनेचे नेते व राज्याचे कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांच्यासह आपल्याकडे पाठपुरावा करून देखील राज्य तक्रार निवारण समितीची बैठक या विषयाबाबत बोलाविण्यात आलेली नाही.
आज रजाकारांपासून आम्हाला मुक्ती मिळून ७३ वर्षे झाले व या मुक्ती संग्राम दिनी आपल्याला शुभेच्छा देत असताना उस्मानाबाद जिल्ह्यावर होत असेलल्या या घोर अन्यायाची जबाबदारी ठाकरे सरकारवर आहे, हे देखील आवर्जून नमूद करावे लागत आहे. 'आकांक्षीत' जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र सकारात्मक असताना आपलेच राज्य सरकार सहकार्य करत नाही ही भावना खूप वेदनादायी आहे. आपण संवेदनशील नेते आहात, महाराष्ट्राचे प्रमुख आहात. आपल्याकडे उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने मी न्याय करण्याची आग्रही मागणी करतो आहे.
आपला स्नेहांकित,
(राणाजगजितसिंह पाटील )
असे निवेदन , पत्र आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाठविले आहे...
Ad........................................