निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या विशेष दुरुस्तीचा रु. ११३.५३३ कोटीचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर – आ.राणाजगजितसिंह पाटील

0
Dharashiv :
मागील १२ वर्षापासून बंद असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून उच्चाधिकार समितीच्या मान्यतेने या योजनेच्या विशेष दुरुस्ती चा रु. ११३.५३३ कोटी अंदाजपत्रकीय किमतीचा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून दि. ०३/०६/२०२४ रोजी प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात आला असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी उप मुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून ही महत्त्वाची योजना कार्यान्वित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले होते. या अनुषंगाने विविध विभागांची आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी आता शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

धाराशिव, लोहारा व औसा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत महत्वपूर्ण आहे. मागील अनेक वर्षांपासून देखभाल दुरुस्ती अभावी बंद असलेली ही योजना कार्यान्वित करण्यासाठी स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी या तिन्ही विभागां संबंधित दुरुस्ती आवश्यक होती. या योजनेचे आशिव, कानेगाव, करजखेडा, वडाळा, बामणी असे ५ टप्पे असून यामुळे ६८९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यातील ५७०० क्षेत्र केवळ धाराशिव तालुक्यातील आहे.

सदरील योजना कार्यान्वित करण्यासाठी योजेनची संपूर्ण पाहणी करून स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी संबंधित दुरुस्तीचे अंदाज पत्रक तयार करून विशेष दुरस्तीचा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या मंजुरीने राज्य तांत्रिक सल्लागार समितीच्या मंजूरी साठी पाठविण्यात आला होता. सदरील समितीने दि. ११/०१/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावास मंजूरी दिली होती.  

तद्नंतर उपस्थित त्रुटींची पूर्तता करत आवश्यक  सर्व प्रक्रिया पूर्ण करून अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. शासनाची मंजूरी व निधीची तरतूद करून घेण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)