भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड यांनी आज सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले.
राजेश्वरी गायकवाड या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाज आहेत. मूळच्या विजापूरच्या असलेल्या गायकवाडने कर्नाटक महिला संघाकडून क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.
२०१४ मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये तर श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २०१७ मध्ये झालेल्या भारतीय विश्वचषक संघात आणि २०२० च्या टी-२० विश्वचषक संघात त्या सहभागी झाल्या होत्या. २०२३ पासून राजेश्वरी गायकवाड या महिला प्रीमियर लीगमध्ये युपी वॉरियर्स संघाकडून खेळत आहेत.
गायकवाड कुटुंबीयांनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेऊन देवींची आरती व ओटी भरत कुलधर्म कुलाचार केले.
मंदिर संस्थानच्या वतीने श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा भेट देऊन गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सहा. जनसंपर्क अधिकारी प्रशांत जाधव, सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, सहा. स्वच्छता निरीक्षक नितीन भोयर व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.