महामानव बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी भव्यदिव्य मिरवणूक, विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन; बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने उपक्रम

0

धाराशिव - 
बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने महामानव, बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. 27) धाराशिव येथे भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रि जन्मशताब्दी वर्षानिमित्त देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक धनंजय नाना शिंगाडे यांनी दिली. 

धाराशिव शहरातील मेघमल्हार हॉलमध्ये शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद घुले, माजी अध्यक्ष अ‍ॅड. परवेज अहमद, कोषाध्यक्ष विशाल शिंगाडे, मार्गदर्शन समिती सदस्य खलील सय्यद, अ‍ॅड. खंडेराव चौरे, राजेंद्र अत्रे, इलियास पीरजादे, प्रसेंजीत शिंगाडे, सरिपुत शिंगाडे, रवि कोरे आळणीकर, इंद्रजित देवकते यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जयंती उत्सव समितीच्या वतीने यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 11 जणांचा समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री राम शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी जयंती सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे. 

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी अधिकारी जयंती उत्सव समितीच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. याकरिता जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. धाराशिवची आकांक्षित जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी या माध्यमातून मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छ्त्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मूर्तीचे पूजन करून या मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. यामध्ये 120 लोकांचे गजाढोल पथक, तसेच केरळ राज्य, कोल्हापूर, सांगली व इतर जिल्ह्यातील पारंपरिक वाद्य पथक सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बदलत्या काळात पारंपरिक वाद्यांच्या पथकांना या माध्यमातून रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

प्रास्ताविकात जयंती समितीचे अध्यक्ष मुकुंद घुले यांनी जयंती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. तर जयंती समितीचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. परवेज अहमद यांनी गतवर्षी झालेल्या कार्यक्रमाबाबत सविस्तरपणे सांगितले. खलील सय्यद म्हणाले की, धनंजय शिंगाडे यांनी सर्व जातीधर्माच्या घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू केली आहे. ही परंपरा सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. अ‍ॅड. खंडेराव चौरे म्हणाले की, यावर्षी धनगर समाजातील मुकुंद घुले यांना जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी संधी देऊन धनंजय शिंगाडे यांनी सामाजिक सलोखा जपण्याचे काम केले आहे. धनगर समाजाचा आदर्श असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रि जन्मशताब्दी वर्षानिमित्त देखील त्यांनी पुढाकार घेतल्याबद्दल अ‍ॅड. चौरे यांनी आभार व्यक्त केले. इंद्रजित देवकते यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती देऊन सर्व बांधवांनी या जयंती सोहळयात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

दुपारी 3 ते 6 या वेळेत मिरवणूक उद्घाटन स्थळी कार्यक्रम होणार असून त्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ होईल.भीम नगर, त्रिशरण चौक, पोष्ट ऑफिस, काळा मारुती चौक या मार्गावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर चौकपर्यंत ही मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी जयंती उत्सव समितीचे आजी - माजी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top