धाराशिव: आमदार राणा पाटील यांच्या समर्थकांनी 'धाराशिव लाइव्ह' न्यूज पोर्टल आणि त्याचे संपादक सुनील ढेपे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देताच, संपादक ढेपे यांनी अत्यंत आक्रमक आणि कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. "माझ्यावर आरोप करण्याऐवजी हिंमत असेल तर आमदार राणा पाटलांनी माझ्याशी संपत्तीची अदलाबदल करावी, त्यांची सर्व संपत्ती मी गोरगरिबांना वाटून टाकेन," असे थेट आव्हानच ढेपे यांनी दिले आहे.
आमदार पाटील यांच्या समर्थकांनी दिलेल्या निवेदनात 'धाराशिव लाइव्ह'ला शासनाची परवानगी नसल्याचा दावा केला आहे. यावर ढेपे यांनी "हा घ्या पुरावा" म्हणत आपला दावा खोडून काढला.
या निवेदनातील दुसरी मागणी संपादक सुनील ढेपे यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) तपासण्याची होती. या मागणीला केवळ सहमती न दर्शवता, ढेपे यांनी एक पाऊल पुढे टाकत, "माझे CDR जरूर तपासा, पण सोबत आमदार राणा पाटील आणि मल्हार पाटील यांचेही CDR तपासले पाहिजेत," अशी प्रतिमागणी केली आहे.
तिसरा आणि सर्वात गंभीर आरोप ढेपे यांच्या पुण्यातील संपत्तीच्या चौकशीची मागणी हा होता. यावर सुनील ढेपे यांनी संताप व्यक्त करत म्हटले, "माझ्या संपत्तीची जरूर चौकशी करा, पण त्याचवेळी राणा पाटील आणि त्यांच्या चमच्यांच्या संपत्तीचीही निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे."
आपल्या भूमिकेला अधिक धार देत ढेपे यांनी एक अभूतपूर्व आव्हान दिले आहे. ते म्हणाले, "माझी सगळी संपत्ती आमदार राणा पाटलांच्या नावावर करा आणि त्यांची माझ्या नावावर करा. मी ती सर्व संपत्ती इथल्या गोरगरिबांना वाटून टाकीन."
शेवटी, पोलिसांमार्फत दबाव टाकण्याच्या या प्रकारावर बोट ठेवत ढेपे यांनी सुनावले, "चमच्यांनो, जर तुमची खरंच बदनामी झाली असेल, तर कायदेशीर मार्ग वापरा आणि कोर्टात दावा दाखल करा. प्रत्येक वेळी पोलिसांचा आधार का घेता?"
या थेट आणि आक्रमक उत्तरानंतर धाराशिवच्या राजकीय आणि पत्रकारिता वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.