धाराशिव,दि.4 नोव्हेंबर (जिमाका) जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक मोहिमेअंतर्गत चाईल्ड हेल्पलाईन (CHILD HELPLINE 1098) टीमने तत्परतेने कार्यवाही करत उमरगा तालुक्यातील एकुरगा व धाराशिव तालुक्यातील जहागीरदार वाडी येथील दोन बालविवाह रोखण्यात यश मिळवले.
एकुरगा येथील 17 वर्षीय व जहागीरदार वाडी येथील 16 वर्षीय अल्पवयीन बालिकांचे विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती CHILD HELPLINE ला प्राप्त झाल्यानंतर तातडीने दोन्ही ठिकाणी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली.तपासणीत दोन्ही बालिकांचे वय विवाहासाठी अपुरे असल्याचे स्पष्ट झाले.
बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 नुसार मुलीचे विवाहाचे किमान वय 18 वर्षे आणि मुलाचे 21 वर्षे असणे आवश्यक आहे.त्यामुळे हे विवाह कायदेशीरदृष्ट्या अवैध ठरत असल्याने,तत्काळ हस्तक्षेप करून दोन्ही विवाह थांबविण्यात आले.
सदर कारवाई श्री.किशोर गोरे,प्रभारी महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली,श्री.अमोल कोवे,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि श्री.विकास चव्हाण,जिल्हा प्रकल्प समन्वयक (CHL) यांच्या आदेशानुसार करण्यात आली.या मोहिमेत श्री.अशोक चव्हाण (सुपरवायजर),श्री.अभयसिंह काळे (केसवर्कर),श्रीमती.पल्लवी पाटील (सुपरवायजर),श्री.अमर भोसले (सुपरवायजर) तसेच ग्रामसेवक श्री. दयानंद कोळी (एकुरगा), श्री.ए.बी. माने (जहागीरदार वाडी) व दोन्ही गावांतील ग्राम बाल संरक्षण समित्यांचे सदस्य यांनी सक्रिय सहभाग घेतला.
कार्यवाहीदरम्यान दोन्ही बालिकांचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले तसेच बालविवाह न करण्याबाबत त्यांच्याकडून हमीपत्र व पंचनामा घेण्यात आला.दोन्ही बालिकांना बालकल्याण समिती, धाराशिव समोर सादर करण्यात आले असून समितीच्या आदेशानुसार जहागीरदार वाडी येथील बालिकेस ‘आपलं घर’ बालगृह,नळदुर्ग येथे दाखल करण्यात आले आहे.
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की,जिल्ह्यात कुठेही बालविवाहाची माहिती मिळाल्यास तत्काळ CHILD HELPLINE 1098 किंवा बाल संरक्षण कक्ष, धाराशिव यांना कळवावे,जेणेकरून बालविवाह रोखता येईल व बालकांचे भवितव्य सुरक्षित राहील.


