कोविड विषाणू तपासणी प्रयोगशाळेसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा --पालकमंत्री गडाख

0


             उस्मानाबाद,दि.31(जिमाका):- येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोविड -19 विषाणू तपासणी प्रयोग शाळेसाठी आणखी काही अत्यावश्यक साहित्याची खरेदी करावी लागणार आहे.त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव तयार करून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दयावा अशा सूचना राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख यांनी  दि.31 जुलै रोजी केल्या.

       पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी कोविड विषाणू तपासणी प्रयोग शाळेची पाहणी केली. त्यानंतर याबाबत विद्यापीठ सिनेट सदस्य संजय निबांळकर यांनी प्रयोग शाळेस केमिस्ट, लॅब टेक्नीशीन,पॅथोलाजीस्ट आदिची संख्या अपूरी असून ती उपलब्ध करून देण्यात यावी. सध्या या प्रयोग शाळेतून एका शिप्‍टमध्ये 90 नमुन्याची तपासणी केली जात असून ती 2 शिप्‍टमध्ये करण्यात येते. यापुढे 3 शिप्‍टमध्ये तपासणी करावयाची असल्याने वजा 18 व वजा 20 डिग्री सेंटीग्रेटचे फ्रिजर लागणार आहेत.त्यामुळे हे साहित्य खरेदी करण्यासाठी कमीत कमी 30 लाख रूपयेची निधीची आवश्यकता भासणार आहे. तसेच या प्रयोग शाळेसाठी पक्का रस्ता नसल्याने या रस्त्याचे काम आमदार किंवा खासदार निधीतून करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी देखील निबांळकर यांच्या मागणीस दुजोरा देत व पुढील महिन्यात रुग्णांची संख्या वाढणार असल्याने सदरील साहित्य उपलब्ध करून देण्याची त्यांनीही मागणी केली

       यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिबांळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या कामासाठी माझ्यासह इतर सर्व लोकप्रतिनिधी सहकार्य करतील असे आश्वासन दिले.यावेळी आमदार कैलास घाडगे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे,उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे,तहसिलदार गणेश माळी,उपकेंद्राचे संचालक गायकवाड, नोडल अधिकारी दीक्षीत, कराळे आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी पालकमत्र्यांनी ही प्रयोग शाळा उभारणीसाठी सतत पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लावल्या बद्दल संजय निबांळकर व जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांचे विशेष कौतूक केले.

       त्यानंतर  जिल्हा शासकीय रूग्णालयातील कोविड सेंटरला पालकमंत्री गडाख यांनी भेट देऊन तेथील आरोग्य सुविधा व रुग्णांलयातील रुगण व पुरविण्यात येत असलेल्या सर्व सोयी सुविधांची पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनजंय पाटील यांच्याशी चर्चा करून कोणत्या प्रकारच्या अडचणी येत आहेत ? हे जाणून घेऊन या रूग्णांलयामध्ये आवश्यक लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनास सूचना दिल्या. तसेच वैराग रोड लगत असलेल्या  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे निवासी वस्तीगृह या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरला भेट देऊन  पाहणी करून तेथील सर्व परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर खाँजा गाजी रहे दर्गाह  या देवस्थान परीसरात मोहल्ला क्लिनिक सुरू करणाऱ्या कार्यकर्त्याशी संवाद साधत त्यांना आवश्यक असलेली रूग्णवाहिका  डॉक्टरसह  कर्मचारी उपलब्ध करून देण्याची सूचनाही प्रशासनाला केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top