“खुनासहित दरोडा, मोका गुन्ह्यातील पाहिजे आरोपी पाठलागानंतर जेरबंद.”
स्थानिक गुन्हे शाखा: विलास लक्ष्मण भोसले, रा. सिंदगाव, ता. तुळजापूर यांचा सावत्र आई- जयाबाई, वय 45 रा. जेवळी, ता. लोहारा यांच्याशी कौटुंबीक संघर्ष होता. यातुन त्याने आपली मुले- किरण व अर्जुन यांसह जावई- विशाल परमेश्वर शिंदे, यांच्या मदतीने दि. 07.03.2020 रोजी 23.00 वा. सु जयाबाई यांना राहत्या घरी लोखंडी सळई, चाकु- भाल्याने वार करुन ठार केले होते. तर आई सोबत असणाऱ्या संतोष पवार यांना गंभीर जखमी केले होते. गुन्ह्यानंतर सर्व आरोपी अटक टाळण्यासाठी बेपत्ता झाले होते. ते गावापासून दुर अंतरावर माळरानावर ते पाल टाकून राहत असत. त्यांचा ठावठीकाणा पोलीसांना वेळोवेळी मिळुन येत होता. परंतु पथक पोहचण्यापुर्वीच ते आपले ठिकाण बदलत असत.
चौघा आरोपींपैकी विलास भोसले व विशाल शिंदे हे दोघे तुळजापूर तालुक्यातील मौजे कुनसावळे शिवारात पाल टाकून राहत असल्याची गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री. पांडुरंग माने यांच्या पथकास मिळाली. यावर स्था.गु.शा. चे पोनि- श्री. दगुभाई शेख, सपोनि- श्री. आशिष खांडेकर, पोउपनि- श्री. पांडुरंग माने यांसह 12 पोलीस कर्मचारी व लोहारा पो.ठा. चे सपोनि- श्री. चौरे व 8 पोलीस कर्मचारी अशा 24 सदस्यांच्या पथकाने कुनसावळे शिवारातील पालावर दि. 30.08.2020 रोजी मध्यरात्री 02.00 छापा टाकला. पोलीसांची चाहुल लागताच आरोपी- विलास व विशाल हे दोघे तेथून पळून जाउ लागले. यावर पथकाने त्यांचा पाठलाग करुन आवश्यक बळाचा वापर करुन त्यांना जेरबंद केले.
यातील विलास भोसले हा वरील गुन्ह्यासोबतच तामलवाडी पो.ठा. गु.र.क्र. 83 / 2014 या खुनासहीत दरोड्याच्या, मोका कायद्यांतर्गत गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असुन गेली 6 वर्षे तो लपुन-छपून राहत होता. तर याच गुन्ह्यातील त्याच्या 3 साथीदारांना मा. न्यायालयाने यापुर्वीच जन्मठेप सुनावली आहे.
पोलीस पथकाने केलेल्या या कारवाईबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे यांनी अभिनंदन केले आहे.
“नाकाबंदी दरम्यान 226 कारवाया- 46,400 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.”
उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 29.08.2020 रोजी नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 226 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 46,400 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.
“चोरी.”
पोलीस ठाणे, भुम: शिवनाथ विठोबा नागरगोजे, रा. तिनखडी, ता. पाथर्डी हे दि. 29.08.2020 रोजी 03.30 वा. सु. भुम तालुक्यातील पार्डी घाटातून पिकअप क्र. एम.एच. 16 सीसी 2494 मधून ईलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटर बॉक्स घेउन जात होते. दरम्यान घाटरस्त्यामुळे पिकअपची गती कमी झाल्याचा फायदा घेउन अज्ञात चोरट्याने पिकअपचे पाठीमागील टारपोलीन फाडून आतील 33000 एमएफडी 250 व्हीडीसी क्षमतेचे 8 ईलेक्ट्रॉनिक्स कॅपॅसिटर चोरुन नेले. अशा मजकुराच्या शिवनाथ नागरगोजे यांनी दि. 29.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): सिताराम दिगंबर भंगे, रा. शिवाजीनगर पुणे हे दि. 28.08.2020 रोजी 20.45 वा. सु. पुणे- मुखेड असा होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. 5826 ने प्रवास करत होते. दरम्यान मौजे येडशी जवळील सम्राट हॉटेलजवळ ते लघुशंकेस थांबले असतांना दोन अनोळखी व्यक्तीं तेथे आल्या. त्यातील एकाने सागर असे नाव सांगुण मोबाईल फोन कॉल करण्याचा बहाण्याने सिताराम भंगे यांचा मोबाईल फोन मागून घेतला. फोन हाती येताच त्या दोघांनी बाजूस उभी असलेली सिताराम भंगे यांची मोटारसायकल पळवून घेउन गेले. अशा मजकुराच्या सिताराम भंगे यांनी दि. 29.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“अपहरण.”
पोलीस ठाणे, कळंब: मुंबई येथे राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेने कळंब येथील एका 17 वर्षीय तरुणाशी (नाव- गाव गोपनीय) इन्स्टाग्राम, व्हाट्सॲप द्वारे ओळख परिचय वाढवून त्यास मुंबई येथे बोलावले. यावर तो तरुण दि. 25.08.2020 रोजी कळंब येथून मुंबईस निघून गेला. त्याची पुन्हा काही माहिती कुटूंबीयांना मिळाली नाही. यावरुन त्या महिलेनेच त्याचे अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलाच्या वडलांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अन्वये गुन्हा दि. 29.08.2020 रोजी नोंदवला आहे.
“मारहाण.”
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): चंद्रकला अर्जुन कानडे, रा. वरुडा, ता. उस्मानाबाद यांसह त्यांचे दिर, पुतण्या- लालासाहेब यांना दि. 26.08.2020 रोजी सायंकाळी राहत्या घरासमोर गावकरी- दिपक काळे, नामदेव कानडे, विशाल गाढवे यांसह 6 व्यक्तींनी जुन्या वादावरुन शिवीगाळ करुन, काठी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या चंद्रकला यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन दि. 29.08.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.