अंगणवाडीच्या सौंदर्यामुळे मुलांचे मानसिक सौंदर्यपूर्ण फुलते-डॉ. विजयकुमार फड

0

उस्मानाबाद -  जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी शाळा ह्या आतून-बाहेरून स्वच्छ व सुंदर करण्याचे निर्देश डॉ. फड यांनी यापूर्वीच दिले होते. सदर निर्देशाप्रमाणे कार्यवाही झाली आहे किंवा कसे हे पाहण्यासाठी फड यांनी काही अधिकाऱ्यांसह दौरा केला. काही अंगणवाड्याची पाहाणी केली. अंगणवाड्याची सुंदरता ही शाळेत येणाऱ्या मुलांच्या मानसिक सौंदर्याचा आधारस्तंभ होत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी  म्हटले. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 1893 अंगणवाड्या स्वच्छ व सुंदर कराव्यात तसेच मुलांसाठी शैक्षणिक साहित्य तयार करावे त्याचबरोबर पक्ष्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था व परसबाग करण्याचे निर्देश फड यांनी दिले होते. त्यांच्या निर्देशाप्रमाणे जवळपास सर्वच अंगणवाड्या रंगरंगोटी करून तसेच वृक्षारोपणाच्या माध्यमातून सुंदर करण्यात आल्या आहेत. 

त्याबद्दल फड यांनी अंगणवाडी सेविका ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांचे कौतुक केले. अंगणवाडी शाळा आतून-बाहेरून सुंदर होणे म्हणजे त्या शाळेत येणाऱ्या मुलांच्या मानसिक सौंदर्ययात भर पडण्यास मदत करणे होय, असे फड यांनी उस्मानाबाद व तुळजापूर तालुक्यातील काही गावातील अंगणवाडीच्या भेटीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले. मुले बऱ्याच गोष्टी लहानपणीच पाहून शिकत असतात. म्हणून त्यांच्या डोळ्यांना चांगले दिसेल, त्यातून त्यांना प्रेरणा मिळेल अशाप्रकारे शाळा, साहित्य, राहणीमान असावे अशा सूचनाही फड यांनी केल्या. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, अनंत कुंभार,  डॉ. नामदेव आघाव, गट विकास अधिकारी श्री प्रशांतसिंह मरोड, ग्रामसेवक, सरपंच, शिक्षक आदी उपस्थित होते.
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top