राष्ट्रीय रायफल स्पर्धेत सोयबा सिद्दीकीचे यश
उस्मानाबाद दि.२२ (प्रतिनिधी) - राष्ट्रीय रायफल शुटिंग असोसिएशनच्यावतीने गुजरात येथील अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या आठव्या वेस्ट झोन रायफल शुटिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत उस्मानाबादच्या सोयबा तौफिक सिद्दीकी हिने चमकदार कामगिरी करत पाचवा क्रमांक पटकावला आहे. तिची ऑक्टोंबर २०२१ मध्ये इंदौर येथे होणार्या राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळामध्ये राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पोहचणारी सोयबा सिद्दीकी ही उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली आहे.
ऑलिम्पिक खेळात जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग वाढविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट रायफल असोसिएशनची ती खेळाडू आहे.
राष्ट्रीय रायफल शुटिंग असोसिएशनच्यावतीने अहमदाबाद येथे दि. १४ ते २१ ऑगस्ट या कालावधीत आठवी वेस्ट झोन शुटिंग चॅम्पियनशीप स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ९८० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्र रायफल असोसिएशन, मुंबईच्या संघामधून उस्मानाबाद डिस्ट्रीक्ट रायफल असोसिएशनची खेळाडू सोयबा सिद्दीकी हिने पाचवा क्रमांक पटकावत नेमबाजीमध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचा लौकीक वाढवला आहे. ऑक्टोंबर महिन्यात मध्य प्रदेशातील इंदौर येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
या यशाबद्दल उस्मानाबाद डिस्ट्रीक्ट रायफल असोसिएशनचे अध्यक्ष व कोच अजीम शेख, सचिव शाहीन शेख, कोषाध्यक्ष फेरोज पल्ला, सदस्य तौफीक सिद्दीकी, राकेश पवार, आकाश मोरे, मयुर दुरूडकर, चेतन सपकाळ यांच्यासह क्रीडाप्रेमी नागरिकांनी सोयबा हिचे कौतूक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
* सामान्य कुटुंबातील मुलीची राष्ट्रीय स्पर्धेत धडक
उस्मानाबाद डिस्ट्रीक्ट रायफल असोसिएशनची सोयबा सिद्दीकी ही अतिशय सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. वडिल तौफीक सिद्दीकी हे शेती करून कुटुंब चालवितात. आपल्या मुलांनी कुटुंबाचे नाव उंचावले पाहिजे म्हणून त्यांनी सोयबा हिस प्रोत्साहन दिले. सोयबा हिने रायफल शूटिंग क्रीडा प्रकारात आवड दर्शविल्याने तिला वडील तौफीक सिद्दीकी यांनी संपूर्ण पाठबळ दिले. दीड वर्षापूर्वी लातूर येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेत पाऊल ठेवले होते. आता रायफल शूटिंगसारख्या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेत धडक घेणारी उस्मानाबादसारख्या भागातली ती पहिली खेळाडू ठरली आहे.