शिंदेवाडीला आणखीन एका डांबरी रस्त्याने जोडणार!
मजबुतीकरणासह डांबरीकरणासाठी पाठपुरावा करणार
ग्रामपंचायत सदस्य बाकले यांची माहिती
मजबुतीकरणासह डांबरीकरणासाठी पाठपुरावा करणार
ग्रामपंचायत सदस्य बाकले यांची माहिती
उस्मानाबाद: तालुक्यातील शिंदेवाडी-सारोळा व मसोबापाटी रस्त्याचे काम सध्यस्थितीत वेगात सुरू आहे. मात्र इतर जिल्हा मार्ग ते शिंदेवाडी (सुतमिल-वाघोली) या रस्त्याचे मजबुतीकरणासह डांबरीकरणही झालेले नाही. त्यामुळे संबंधित विभागाकडे यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. सरपंच प्रशांत रणदिवे, उपसरपंच भाग्यश्रीताई देवगिरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली मजबुतीकरणासह डांबरीकरणासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी दिली.
शिंदेवाडी गावास जोडणाऱ्या रस्त्याची बिकट अवस्था झाली होती. पावसाळ्यात ग्रामस्थांसह वाहन चालकांचे मोठे हाल सुरू होते. याची दखल घेवून सारोळा-शिंदेवाडी ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी सारोळा-शिंदेवाडी-मसोबा पाटी या रस्त्याच्या मजबुतीकरणासह डांबरीकरणासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयाकडे गत २०१७ पासून पाठपुरावा केला होता. त्यानंतर निधी मंजूर होवून कामही सुरू झालेले आहे. लवकरच डांबरीकरण होणार असून रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र इतर जिल्हा मार्ग (सुतमिल ते वाघोली) ते शिंदेवाडी या रस्त्याचे अद्याप मजबुतीकरणासह डांबरीकरण झालेले नाही. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे हा रस्ता येतो. या रस्त्याचे डांबरीकरण झाल्यास उस्मानाबादहून आल्यानंतर थेट शिंदेवाडीला जाणे सोयीस्कर होणार आहे. तसेच अंतरही कमी आहे. ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी सोमवारी (दि.१३) या रस्त्याची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी सोमनाथ माने, संगमेश्वर स्वामी यांची उपस्थित होती. तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून लवकरच याही रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही श्री. बाकले यांनी दिली.