सकनेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालाही मिळणार ग्रामीण मार्ग क्रमांक परिपूर्ण प्रस्ताव बांधकाम विभागाकडे दाखल : सारोळा ग्रामपंचायत सदस्य बाकले यांचा पुढाकार

0

सकनेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालाही मिळणार ग्रामीण मार्ग क्रमांक परिपूर्ण प्रस्ताव बांधकाम विभागाकडे दाखल
सारोळा ग्रामपंचायत सदस्य बाकले यांचा पुढाकार


उस्मानाबाद: उस्मानाबाद-औसा राज्यमार्ग ते सकनेवाडी गावाकडे जाणारा एक गाडी रस्ता आहे. या रस्त्याला ग्रामीण मार्ग क्रमांक नसल्याने मजबुतीकरणासह खडीकरणही झालेली नाही. त्यामुळे या रस्त्याला ग्रामीण मार्ग क्रमांक मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. रस्त्याला ग्रामीण मार्ग क्रमांक मिळाल्यास रस्त्याचे डांबरीकरण होवून विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी दिली.
उस्मानाबाद-औसा राज्य मार्गापासून सकनेवाडी गावाकडे एक जुना गाडी रस्ता आहे. या रस्त्यावरून शिक्षणासाठी सारोळा गावात विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. तसेच बँक, सोसायटीसह विविध कामानिमित्त शेतकरी, ग्रामस्थही या रस्त्याचा वापर करतात. मात्र या रस्त्याला ग्रामीण मार्ग क्रमांक नसल्याने जिल्हा परिषदेसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मजबुतीकरणासह डांबरीकरणासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे पक्क्या रस्त्याअभावी पावसाळ्यात विद्यार्थी, शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे तत्काळ कृती आराखड्यात या रस्त्याला ग्रामीण मार्ग क्रमांक देण्यात यावा, असे निर्देश आ. कैलास घाडगे-पाटील यांनी कार्यकारी अभियंत्यांना पत्र देवून दिले होते. सारोळा सरपंच प्रशांत रणदिवे, सकनेवाडीच्या सरपंच सारिका काकडे व उपसरपंच अतुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सारोळा ग्राम पंचायत सदस्य विनोद बाकले यांनी बांधकाम विभागाकडे शुक्रवारी (दि.३) आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. यावेळी नितीन घायतिडक, अजित सिरसट उपस्थित होते. कनिष्ठ सहाय्यक जे. आर. औटे व शाखा अभियंता डी. के. पाटील हे परिपूर्ण प्रस्ताव तयार करत आहेत. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांच्या स्वाक्षरीने हा परिपूर्ण प्रस्ताव थेट मंत्रालयात मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात या रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळणार असून रस्त्याचे डांंबरीकरण होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top