भारतासाठी धोका ; दक्षिण आफ्रिकन दोघे कोरोनाग्रस्त
आफ्रिकेत सापडलेल्या या नव्या विषाणूचं नामकरण जागतिक आरोग्य संघटनेनं ' ओमिक्रॉन ' ( B.1.1.529 ) असं केलं आहे . जगात अनेक देशांनी उपाययोजना सुरु केली असतानाच भारताची चिंता वाढली आहे . दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे . दक्षिण आफ्रिकेवरून भारतात बंगळूरू विमानतळावर दाखल झालेल्या दोन जणांमध्ये कोरोनाचे नवा स्ट्रेन आहे की नाही याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही . या सर्वांना ट्रॅक करून त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत . बंगळूरुच्या केम्पेगौडा विमानतळावर शनिवारी ( 27 नोव्हेंबर ) दक्षिण आफ्रिकेतून विमान आले . या विमानात 594 प्रवासी होते . त्यापैकी दोन दक्षिण आफ्रिकेचे नागरिक कोरोनाबाधित आढळले आहेत .
दक्षिण आफ्रिकेसह हाँगकाँग येथे कोरोनाचे ओमिक्रॉन हे नवे रुप आढळले आहे . कोरोनाच्या या नव्या रुपाची संपूर्ण जगाने धास्ती घेतली आहे . महाराष्ट्रातील मुंबई विमानतळावर जगभरातून प्रवसी येतात . याच कारणामुळे आता मुंबई पालिका सज्ज झाली आहे . विमातनळावर उतरलेल्या प्रवाशांना आता संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे . तसेच कोरोना रुग्ण आढळलाच तर त्याच्यावर कोरोना उपचार केंद्रामध्ये स्वतंत्रपणे उपचार करण्यात येणार आहेत . तशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलीय . आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ . अविनाश भोंडवे यांनी तर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते असा सूचक इशारा दिलाय . कोरोनाच्या या नव्या रुपावर अँटीबॉडीजचाही काही परिणाम होणार नाही , असंदेखील त्यांनी म्हटलंय .