उस्मानाबादेत तिसरी राज्यस्तरीय गंगाधर करंडक स्पर्धा....
उस्मानाबाद ( प्रतिनिधी ) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेच्या वतीने ७,८,आणि ९ जानेवारी २०२२ ला उस्मानाबादेत तिसरी राज्यस्तरीय गंगाधर करंडक स्पर्धा घेतली जाणार आहे. उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे आणि एस.पी.शुगर चे अध्यक्ष कथा करंडक स्पर्धेचे स्वागत अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे. २०१८ मध्ये ५३ तर २०१९ मध्ये ४५ संघ यामध्ये सहभागी झाले होते.राज्यभरातील प्रसिद्ध नामवंत आणि हौशी कलावंत या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतात. हे यापूर्वी घेण्यात आलेल्या दोन स्पर्धातून दिसून आलेले आहे.
उस्मानाबाद नगरपालिका प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
सहभागी सर्व कलावंताच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने निशुल्क करण्यात आलेली आहे.
यामध्ये राज्यभरातील जास्तीत जास्त नाट्यसंस्था, कलावंतांनी सहभाग घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उस्मानाबाद शाखा अध्यक्ष विशाल शिंगाडे आणि एस पी शुगर चे अध्यक्ष तथा स्पर्धेचे स्वागत अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केलेले आहे.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे 71 हजार रुपयांचे रोख बक्षीस करंडक आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक 51 हजार रुपये रोख करंडक आणि प्रमाणपत्र तृतीय पुरस्कार 41 हजार रुपये रोख करंडक आणि प्रमाणपत्र तसेच चौथे बक्षीस 25 हजार रुपये रोख करंडक आणि प्रमाणपत्र उत्तेजनार्थ 15 हजार रुपयांचे रोख बक्षीस करंडक आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
विशेष म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री लेखक,संगीत प्रकाश,योजना यांना देखील या स्पर्धेत मध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहे. या पत्रकार परिषदेसाठी ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे, माधव गरड,रुपेश कुमार जावळे,धनंजय कुलकर्णी,गणेश शिंदे यांच्यासह अन्य साहित्यिक उपस्थित होते.