google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 जिल्ह्यात आणखी ७ टीबी डायग्नोस्टिक सेंटर उभारण्यात येणार : राहुल गुप्ता

जिल्ह्यात आणखी ७ टीबी डायग्नोस्टिक सेंटर उभारण्यात येणार : राहुल गुप्ता

0



जिल्ह्यात आणखी 7 टीबी डायग्नोस्टिक सेंटर उभारण्यात येणार:राहुल गुप्ता

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅलीचे यशस्वी आयोजन

उस्मानाबाद,दि.24(जिमाका):- 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शास्त्रज्ञ डॉ.रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा शल्यचिकित्सक डी. के. पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हलकुडे, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, डॉ.सचिन देशमुख, डॉ. पांचाळ, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ रफ़िक अन्सारी, अधिसेविका जयश्री जाधव, उपप्राचर्य सुनिता पोखरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. होळे, डॉ. बेटकर जिल्हा क्षयरोग कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी आदी उपस्थित होते.

श्री.गुप्ता आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. जिल्हा रुग्णालय येथून ताजमहाल टॉकीज, शिवाजी चौक मार्गे आंबेडकर चौक आणि शहर पोलीस स्टेशन मार्गे परत जिल्हा रुग्णालयापर्यंत रॅलीचा मार्ग होता. त्यानंतर सर्व उपस्थितांना क्षयरोग विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. श्री.गुप्ता यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र वितरण करण्यात आले . 2022 च्या जागतिक क्षयरोग दिन यावर्षीचे घोषवाक्य “टीबी संपविण्यासाठी गुंतवणूक करा व जीव वाचवा” असे आहे.

जिल्ह्यातील संशयित क्षयरोग रुग्णांची लवकर थुंकी तपासणीद्वारे निदान होण्यासाठी सद्यस्थितीतील कार्यान्वित 19 टीबी डायग्नोस्टिक सेंटर मध्ये आणखी 7  सेंटर ची भर घालण्यात येणार आणि सर्व उपजिल्हा रुग्णालय येथे CBNAAT मशीन पुरवण्यात येणार आहेत, त्यासाठी आवश्यक साहित्य आणि मनुष्यबळाचे नियोजन जिल्हा स्तरावरून करण्यात येईल असेही श्री.गुप्ता यांनी सांगितले.

डॉ.डी.के पाटील म्हणाले, आपला जिल्हा निती आयोगामध्ये असल्याने जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातर्फे पूर्णपणे सहकार्य केले जाईल. डॉ. हलकुडे  म्हणाले की,टीबी मुक्त भारत अभियान राबविण्यासाठी एक लाख लोकसंख्येमध्ये 3400 संशयीत क्षयरुग्ण शोधण्याकरिता आरोग्य संस्थेला आवाहन केले आहे. याकरिता आरोग्य संस्थेतील प्रत्येक घटकाचा वाटा मोलाचा राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.रफिक अन्सारी म्हणाले की, समाजातील सर्व संशयित क्षयरुग्ण शोधून निदान झालेल्या क्षय रुग्णास औषध उपचारावर आणण्यात येईल आणि राज्यस्तरावर प्राप्त झालेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तसेच उस्मानाबाद जिल्हा टीबी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करू असेही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top