खरीप हंगाम 2022-23 करिता पिककर्ज वाटपाचा लाभ घेण्याचे आवाहन
Osmanabad news :-
उस्मानाबाद,दि.22(जिमाका): जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खरीप हंगाम 2022-23 करिता पिककर्ज वाटप पुर्व तयारी आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी यांनी बँकनिहाय खरीप पिककर्ज वाटपाबाबतच्या नियोजनाचा आढावा घेवून सर्व बँकांनी दि.30 जून 2022 अखेर बँकांना दिलेल्या लक्षांकाच्या 100 टक्के पिककर्ज वाटप करावे. जिल्हयातील सर्व बँकांनी पिककर्जाचे नुतनीकरणाबरोबरच नविन पात्र शेतक-यांना प्राधान्याने पिककर्ज वाटप करावे,असे निर्देशही श्री.दिवेगावकर यांनी यावेळी दिले.
शासनाने 2022-23 हंगामाकरीता सोयाबीन 53 हजार 900 रुपये, तूर 38 हजार 500 रुपये, ऊस 1 लाख 38 हजार 600 रुपये, उडीद आणि मुग 22 हजार रुपये याप्रमाणे प्रमुख पिकाचे प्रति हेक्टरी पिककर्ज वाटप दर निश्चित केलेले आहेत. त्याप्रमाणे सर्व बँकांनी पिककर्ज वाटप करावे, तसेच पिककर्जापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता सर्व बँकांनी घ्यावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
पालकमंत्री श्री.शंकरराव गडाख हे माहे मे 2022 च्या पहिल्या आठवडयात खरीप हंगाम 2022-23 करीता पिककर्ज वाटपाबाबत आढावा बैठक घेणार आहेत. तरी सर्व बँकांनी पिककर्ज वाटप तात्काळ सुरु करुन त्याबाबतचा प्रगतीदर्शक अहवाल पालकमंत्री महोदय यांच्या बैठकीमध्ये सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी केले आहे.
पी.एम. किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) उपलब्ध करुन देण्याबाबत दि. 24 एप्रिल 2022 ते दि. 01 मे 2022 या कालावधीत ' किसान भागीदारी प्राथमिकता हमारी ' नावाची मोहिम राबविण्यात येत आहे. त्याबाबत विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. तरी बँकांनी लाभार्थ्यांना KCC उपलब्ध करुन दयावे.
जिल्हयातील सर्व पात्र शेतक-यांनी खरीप हंगाम 2022-23 मध्ये पिककर्ज मिळण्याकरिता बँकेशी संपर्क करावा आणि पिककर्ज मिळण्याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास संबंधित तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी केले आहे.


