*महागाईविरोधात काँग्रेसचे उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन
*भावनिक मुद्दे पुढे करुन भाजपा सरकारकडून जनतेची लूट - अॅड.धीरज पाटील
Osmanabad news :-
उस्मानाबाद दि, 4 -
कलम 370, उरी हल्ला, द काश्मिर फाइल्स यासारखे भावनिक मुद्दे पुढे करुन केंद्रातील भाजपा सरकारने जनतेची बेसुमार लूट सुरु केली आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले असताना सरकारला त्याचे काहीही देणेघेणे राहिलेले नाही. अशा परिस्थितीत इंधन दर कमी करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे. सरकारला याची दखल घ्यावीच लागेल, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. धीरज पाटील यांनी दिला.
पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीविरोधात उस्मानाबाद शहर, तालुका व जिल्हा काँग्रेसच्या वतीने उस्मानाबाद येथे काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील व ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि.4) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष अॅड. धीरज पाटील म्हणाले की, त्यामुळे आज पेट्रोल डिझेलच्या दराने शंभरी गाठली आहे. स्वयंपाकाचा गॅस हजारावर गेला आहे. इंधन दरवाढीचा परिणाम सर्वच वस्तूंच्या दरावर झाला आहे. त्यामुळे महागाई दिवसेंदिवस वाढत असताना भाजपा सरकार मात्र जनतेची दिशाभूल करुन महागाईच्या मुद्यावरुन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करत आहे. खोटी आश्वासने देऊन सत्ता उपभोगणार्या भाजपा सरकारला जनता माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.
उपस्थित पदाधिकार्यांनीही यावेळी भाषणामध्ये महागाईच्या मुद्यावरुन मोदी सरकारवर कठोर शब्दांत टिका केली. आंदोलनात प्रदेश सचिव दिलीप भालेराव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी अभिजित चव्हाण, मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष प्रकाश आष्टे, सय्यद खलील, लक्ष्मण सरडे, प्रशांत पाटील तालुकाध्यक्ष रोहित पडवळ, पांडुरंग कुंभार शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मेहबूब पटेल, प्रकाश चव्हाण, मागासवर्गीय विभाग जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, प्रदेश महासचिव शीला उंबरे, संजय घोगरे, आश्रुबा माळी, मिलिंद गोवर्धन, सांस्कृतिक विभागाचे प्रेमचंद सपकाळ, ओबीसी विभाग काका सोनटक्के, प्रभाकर लोंढे, सरचिटणीस अॅड.जावेद काझी,विधी विभागाचे ॲड.विश्वजीत शिंदे अॅड. लोखंडे, प्रवक्ता कृष्णा तवले, अशोक बनसोडे, मेहराज शेख, गजधने, अतुल चव्हाण, चाऊस, गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
*सर्वसामान्य माणसाने जगायचं कसं?*
आंदोलनस्थळी महागाईचा भस्मासुर, काय रे बाबा मोदी कसला रे तुझा खेळ स्वस्त झाले मरण आणि महागले पेट्रोल डिझेल पगार कपात - नोकरी जाण्याची भीती त्यात सतत पेट्रोल डिझेलची दरवाढ सर्वसामान्य माणसाने जगायचं कसं? असे फलक लावून महागाईच्या मुद्याकडे लक्ष वेधले.
*सिलेंडर, दुचाकीला फुले वाहून श्रद्धांजली!*
महागाईमुळे स्वयंपाकाचा गॅस आणि दुचाकी वाहन सर्वसामान्य जनतेला आता परवडणारे राहिले नाही. म्हणून गॅस सिलेंडर आणि दुचाकी वाहनाला पुष्पहार घालून फुले वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
छाया राहुल कोरे आळणीकर