गोदाम बांधकाम व बीज प्रक्रिया प्रकल्पाच्या अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन
Osmanabad news :-
उस्मानाबाद,दि.15(जिमाका):- उस्मानाबाद जिल्ह्यासाठी कृषी विभागाच्यावतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना कडधान्य अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत शेतकरी उत्पादक संघ आणि शेतकरी उत्पादक कंपनीसाठी एक (1) गोदाम बांधकाम तसेच एक (1) बीज प्रक्रिया संघ आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना गळीतधान्य अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत शेतकरी उत्पादक संघ व शेतकरी उत्पादक कंपनीसाठी एक (1) गोदाम बांधकामचा लक्षांक प्राप्त आहे. प्राप्त लक्षांकाच्या अधिन राहून शेतकरी उत्पादक संघ ( FPO ) आणि शेतकरी उत्पादक कंपनी ( FPC ) यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे मागविण्यात येत आहेत.
या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संघ ( FPO ) व शेतकरी उत्पादक कंपनी ( FPC ) यांना 250 मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 15.50 लाख रुपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील व शेतकरी उत्पादक संघ ( FPO ) व शेतकरी उत्पादक कंपनी ( FPC ) यांना बीजप्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्यासाठी ( यंत्रसामुग्री व बांधकामासाठी ) प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 10.00 लाख रुपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. या दोन्ही बाबी बॅक कर्जाशी निगडीत आहेत. लाभार्थ्याने शेतकरी उत्पादक संघ ( FPO ) व शेतकरी उत्पादक कंपनीने ( FPC ) बॅकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित शेतकरी उत्पादक संघ, कंपनी ( FPO / FPC ) सदर बाबीच्या लाभास पात्र राहील. या योजनेसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दि. 08 जूलै 2022 पर्यत अर्ज सादर करावेत. या योजनेचा लाभ एकदाच देण्यात येईल. तरी इच्छूक अर्जदाराने शेतकरी उत्पादक संघ, कंपनी ( FPO / FPC ) या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
*****